रामायण घडले | महाभारत घडले |
त्यांना कारणीभूत | होते कुजके शब्द ||
म्हणून शब्द जपावा | शब्द पुजावा |
शब्द पुसावा | बोलण्या आधी ||
घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी |
एवढा चांगला सल्ला आपल्या संतांनी दिला आहे; पण तो आचरणात आणायचा कुणी, असं प्रत्येकाला वाटत असतं. संचवचनं ही ऐकण्यासाठी असतात, ती आचरणात आणण्यासाठी नसतात, असा बहुतेकांचा गैरसमज झालेला दिसतो. जगातील सर्व अशांततेवरचा हा उपाय आहे. शब्द हे जसं जोडण्याचं काम करतात, तसंच ते तोडण्याचं कामही करतात. शब्दामुळं दंगली पेटतात. शब्दाला मोठी किंमत असते. दिलेला शब्द पाळला नाही, तर माणसं तुटतात. नाती संपतात. शब्द हे या जिभेमुळं उच्चारता येतात, तिच्यावर नियंत्रण असणारी माणसं जगात यशस्वी होतात. जिभ सुटली, की ती चळाचळा कापत सुटते. ती दुधारी आहे. त्यामुळं तर कुठं, काय आणि किती बोलावं हे ज्याला समजतं, त्याचा समाजात मान वाढतो. ज्याला ते समजत नाही, त्याची गणना मग वाचाळवीरात होते. महाराष्ट्रात अलीकडं जमिनीची उत्पादकता कमी झाली असली, तरी या मातीत वाचाळवीरांची पैदास मात्र चांगलीच फोफावली आहे. अर्थात कोणत्याच वाचाळवीरांवर कधीच कारवाई झाल्याचं दिसत नाही. त्याचं कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांनाच अशा वाचाळवीरांकडून काहीतरी वदवून घ्यायचं असतं आणि त्याचे काय पडसाद उमटतात, हे पाहायचं असतं. अशा वाचाळवीरांची संख्या पूर्वी शिवसेनेत जास्त होती; परंतु अलीकड ती संस्कृतीचा ठायीठायी जप करणाऱ्यांच्या पक्षात जास्त झाली आहे. वाण नाही; पण गुण लागला, असं म्हणतात ना, त्यातलाच प्रकार. राजकीय नेत्यांना आता वाचाळतेचा भस्म्यारोग जडला आहे. तो आता जागतिक साथरोग झाला आहे. भारतापासून अमेरिकेपर्यंत कुठंही अशी लक्षण असलेली राजकीय नेतेमंडळी दिसतात. शिष्टाचाराचा विसर पडला आहे. माजी मंत्री आणि महायुतीचे नेते सदाभाऊ खोत हे ग्रामीण भागातील नेते. कृषी संस्कृतीत वाढलेला माणूस जास्त सुसंस्कृत असतो. वारकरी संप्रदायाचा त्याच्यावर प्रभाव असतो. शिवाय ते ज्या जिल्ह्यातून येतात, तो सांगली जिल्हा सातारा जिल्ह्याचाच पूर्वी भाग होता. या जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सुंसस्कृत, प्रचंड अभ्यासू नेता भारताला दिला. राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्यांवरही टीका न करण्याचं भान असणाऱ्या या नेत्याच्या भागातील आता एक एक हिरा काढून पाहिला, तर त्यात कोळसाच जास्त भरलेला दिसतो. शारीरिक व्यगांवर, आजारावर किमान टीका करू नये, याचं भानही आताच्या पिढीतील नेत्यांना राहिलेलं नाही. ज्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी खोत गेले होते, त्या पडळकर यांचा राजकीय वकुब बाजूला ठेवला आणि त्यांची वाचाळता लक्षात घेतली, तर या दोघांबाबतही समान शीलें व्यसने सुसख्यम असंच म्हणावं लागतं.
माणूस एकदा चुकला, तर त्याला माफ करता येतं; परंतु त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करीत असेल, तर तो मुद्दाम तसं करतो, असं म्हणायला वाव आहे. खोत, पडळकर, संजय राऊत, नितेश राणे अशी कितीतरी नावं घेता येतील. त्यांच्या तोंडून चांगलं काही ऐकण्याऐवजी गाळच बाहेर पडलेला दिसतो. गरळ ओकायची, त्यावर टीका झाली, काहुर उठलं, की दिलगिरी व्यक्त करायची आणि नंतर ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरूच.’ आपल्या वयापेक्षा मोठं असलेल्यांचा आदरार्थी उल्लेख करावा, अशी आपली संस्कृती सांगते; परंतु येथे वडीलांच्या, आजोबांच्या वयाच्या नेत्यांचा एकेरीनं उल्लेख केला जातो. ज्याच्या नेतृत्वाखाली कामं केलं, पदं मिळवली, त्याला शेलकी विशेषणं बहाल केल्यानं आपण मोठं होत नसतो, याचं भान या नेत्यांना राहिलं नाही. कमी वकुबाच्या, असंस्कृत व्यक्तीवर मोठं पद लादलं, तर दुसकं काय होणार?
खोत यांनी अनेकदा गरळ ओकण्याचा प्रमाद केला आहे. जी भाषा पूर्वी पडळकर यांनी वापरली, तीच भाषा आता फक्त वेगळ्या स्वरुपात खोत वापरत आहेत. निवडणूक आचारसंहिता असताना अशी भाषा वापरलीच कशी जाऊ शकते आणि निवडणूक आयोगाचे कॅमेरे अशा वेळी जातात कुठं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. जत येथील सभेत खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. शरद पवार यांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं वक्तव्य खोत यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वक्तव्यावरून खोत यांचे कान टोचले आहेत. प्रत्येकानं बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. वाचाळवीरांना थांबवलं गेलं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील राजकीय लोक काहीही बोलतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं आता विरोधकांकडून महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण पाहायला मिळत आहे. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी विकास कामं, भविष्यात काय काम करणार आहात हे सांगायचं असतं;.मात्र राजकारणी एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. पवार यांच्यावर अगोदर एकेरी भाषेत टीका केली. नंतर दिलगिरी व्यक्त केली. खोत यांचं हे पहिलचं वादग्रस्त विधान नाही. यापूर्वीदेखील त्यांनी आपल्या भाषणातून अशी विधान केली आहेत. महाराष्ट्रात मतदान जवळ येत असताना मतदारांमध्ये प्रगल्भ राजकारणाची अपेक्षा आहे. विकास, नवे प्रकल्प, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्यांवर चर्चा होण्याऐवजी खोत यांसारखे नेते अपमानास्पद भाषेत टीका करून प्रचाराचा दिशाभ्रम करत आहेत. खोत यांच्या वक्तव्यांमुळं वादविवाद निर्माण होतो आणि निवडणुकीचा स्तर घसरतो.
या अशा प्रकारच्या प्रचारातून काय मिळतं? विकासाच्या प्रश्नावरून दूर नेऊन व्यक्तिगत हल्ले करण्याचा हा प्रवास थांबायला हवा. राजकीय नेत्यांनी खालच्या स्तरावर टीका करण्याऐवजी राज्याच्या विकासाच्या दिशा ठरवण्यावर लक्ष केंद्रित करावं. खोत म्हणाले, ‘पवारसाहेब, तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने हाणले. बँका हाणल्या. सूतगिरण्या हाणल्या; पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरीसुद्धा भाषणात आता म्हणता, मला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यांना कसला चेहरा बदलायचा आहे. तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र घडवायचा आहे का?,’ पवार यांच्यावरील टीकेला उत्तर देताना खा. संजय राऊत यांनीही पातळी सोडली. खोत हे देवेंद्र फडणवीसांचे कुत्रा आहेत, असं राऊत म्हणाले होते. काही तासांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त कराव्या लागणाऱ्या खोत यांची जीभ पुन्हा घसरली. अर्थात ती जाग्यावर कधी राहते, हाच प्रश्न आहे. ‘राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहेत. डुकराला कितीही साबण लावलं, तर ते घाणीत जातं; पण कुत्रे इमानदार असतात,’ असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच पवार यांना ते ‘शैतान’ म्हणाले होते. टोमॅटोच्या दरावरून सामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. त्यावर त्यांनी सामान्य नागरिकाला फटकारलं. ‘टोमॅटो काय जीवनावश्यक वस्तू आहे का? ज्याला ज्याला लय टोमॅटो लागतात, त्यांना आम्ही सरणाला; पण टोमॅटो देऊ,’ अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली होती; पण ते इतक्यावरचं थांबले नव्हते, तर त्यांनी टोमॅटोच्या दरवाढीवरून अभिनेता सुनील शेट्टी याच्यावरदेखील तोंडसुख घेतलं होतं. टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सामान्य नागरिकच नाही, तर श्रीमंत लोकदेखील वैतागले आहेत. याबाबतची एक पोस्ट अभिनेता सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘सोशल मीडिया’वरून शेअर केली होती. ‘माझी बायको घरी फक्त दोन दिवस पुरेल इतकाच भाजीपाला आणते. ताज्या भाज्या खाण्यावरच आम्ही भर देतो; मात्र आजकाल टोमॅटोच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम आपल्या घराच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. आजकाल मी टोमॅटो कमी खायला सुरुवात केली आहे. असं होऊ शकतं, की लोकांना वाटेल की, तो सुपरस्टार आहे. त्यामुळे महागाईचा त्याच्यावर काय परिणाम होईल; पण तसं काही नाही. आम्हीदेखील या सगळ्या गोष्टींमधून आम्हीही जातो,’ असं शेट्टी यांनी लिहिलं होतं. त्यावर वाचाळवीर खोत यांनी ‘जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी! जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढ ग माई’ असं म्हटलं होतं. राऊत आणि खोत या दोघांच्या भांडणात नितेश राणेंनी उडी घेतली. ‘संजय राऊत हा उद्धव ठाकरेंचा पाळीव कुत्रा आहे. शरद पवारांचाही संजय राऊत हा पाळीव कुत्रा आहे. टॉमी म्हणतात त्याला..’, असं म्हणत राणेंनी निशाणा साधला. ‘एखादा पाळीव कुत्रा तरी निष्ठावान असतो; पण संजय राऊत तर साप आहे. सापाला दूध पाजलं, की तो आपल्याच माणसालाही डसतो’, असं टीकास्त्र त्यांनी डागलं. मागं एकदा एका सभेत “मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो; पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं, की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का?” अशा शब्दांत खोत यांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अग्रलेखाच्या सुरुवातीच्या काव्यपंक्तीप्रमाणं जीभेवरी ताबा । सर्वासुखदाता । पाणी, वाणी, नाणी । नासू नये ॥ असं म्हणावं लागतं.?