राज ठाकरेंची अमितसाठी भावनिक साद
मुंबई : “जे आधी घडले नाही ते आता घडतंय. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली. अनेक आमदार झाले, ठाकरेंचा प्रवास हा दादर, प्रभादेवी, माहीमपासून सुरु झाला. आज याच दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदाच एक ठाकरे उभा राहतोय. आज अमितसाठी माझी ही एकच सभा आहे. अमित ठाकरेला माहीममधून, तर संदीप देशपांडेला वरळीमधून आणि महाराष्ट्रमध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे तिथे तिथे त्यांना निवडून द्या”, असं भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी आज प्रभादेवी येथे आयोजित जाहिर सभेत केले.
“नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित बोलला की सर्व नेत्यांनी उभं राहील पाहिजे, मी पण उभा राहीन. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं उभा राहणार आहेस? तो बोलला तू सांगशील तर राहीन. आज अमितच्या विरोधात जी माणसं उभी आहेत त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो. मात्र त्या घाणीत मला हात नाही घालायचा. तुमच्या हाकेला २४ तास ओ देणारी माणसे हवीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
“अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. मी आज प्रभादेवीमध्ये आलो आहे. तुमची अपेक्षा असेल की समोरच्या उमेदवारबद्दल बोलवं. पण ज्याचे काहीच नाही त्याच्यावर काय बोलावं? अशा शब्दात सदा सरवणक यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.
“सहसा मी जी गोष्ट कधीच करत नाही ती मी आज केली. या सभेला येण्यासाठी मी सिग्नल तोडत आलो. आधीच निवडणूक आयोगाने कमी दिवस दिले, मुंबईमध्ये सगळीकडे पोहोचणे अवघड आहे. तेव्हा महाराष्ट्रात कसं पोहोचणार? ‘सामना’कडे येताना मला सर्व फ्लॅशबॅक येत होते. सर्व जुना काळ समोर येत होता. असं राज ठाकरे म्हणाले.