महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांचे आवाहन
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला एक संधी देऊन मुरबाड तालुका, बदलापूर शहर व ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण परिसराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवू या, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आज येथे केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुरबाड मतदारसंघातील उमेदवार सुभाष पवार यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात दौरा करुन मतदारांबरोबर संवाद साधला जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एक संधी देऊन सर्वांगीण व परिपूर्ण विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे आवाहन केले जात आहे. वाकीची वाडी, कारंद, मोऱ्याचा पाडा, आघणवाडी, चोण गावांना सुभाष पवार यांनी भेट दिली. तसेच मतदारांना महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, आरपीआय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेली १५ वर्षे आपण एका चुकीची शिक्षा भोगत आहोत. ती चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे. केवळ कागदावर झालेल्या विकासाची जाहिरात केली जात आहे. विकास झाला असेल, तर ग्रामस्थ समाधानी का नाहीत, असा सवाल सुभाष पवार यांनी केला. तसेच मला केवळ एकदा आशीर्वाद द्या, मी संधीचं सोने करीन, असे आश्वासन दिले.
आपल्या भागातील पाणी व रस्त्यांची अवस्था बिकट असून, दररोज संघर्ष करावा लागतो. राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामे झालेली नाहीत. लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही. आता अडचणी मांडायच्या कोणाकडे? असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर निवडून आल्यानंतर गावांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही सुभाष पवार यांनी दिली.
संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीला पसंती मिळत आहे. जनशक्तीच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी तुमचे एक मत महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन सुभाष पवार यांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
