राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024
मुंबई : आशा शर्मा आणि पूजा बत्रा या दिल्लीच्या जोडीने ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) संयुक्त विद्यमाने बॉम्बे जिमखाना आयोजित प्राइम सिक्युरिटीज – राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धेत (2024) महिला जोडी (पेअर) स्पर्धेत पहिल्या दिवशी एलिमिनेशन राऊंडनंतर अव्वल स्थान पटकावले.
अर्जेंटिनामधील ब्रिज ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला संघाचा भाग असलेल्या शर्मा आणि बत्रा जोडीने एलिमिनेशनच्या तीन सत्रांच्या शेवटी प्रभावी 81 आयएमपी (IMP) मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
मुंबईची मारियान करमरकर आणि अदिती झवेरी जोडी ७६ आयएमपीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत गुजरातच्या विद्या पटेल आणि कल्पना गुर्जर या युवा जोडीने ७२ आयएमपीसह तिसरे स्थान मिळवले आहे.
राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 35 जोड्या एलिमिनेशन राऊंडमध्ये सहभागी झाल्या. त्यातील 18 जोड्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत.
या स्पर्धेमध्ये महिला दुहेरीसह मिश्र संघ (मिक्स्ड टीम) आणि मिश्र जोडी (मिक्स्ड पेअर) गटाच्या स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धा आठवड्याच्या शेवटी (वीकेंड) सुरू होतील.
