नवी मुंबई : मतदानाविषयी आवश्यक माहिती उपलब्ध होऊन एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले असून मतदानाविषयी आवश्यक माहिती देणारे माहितीपत्रक घरोघरी वाटप करण्यात येत आहे. या माहिती पत्रकाचे अनावरण नुकतेच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, 150 ऐरोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील, 151 बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या माहितीपत्रकावर तरुणाईला तसेच सर्वच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदान करण्याचे महत्वही सांगण्यात आले आहे. तसेच या पत्रकावर वोटर हेल्पलाईन ॲपचे क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले असून ॲन्ड्रॉइड व ॲपल अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनसाठी स्वतंत्र क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले आहेत. हा क्यूआर कोड स्कॅन करुन कोणताही मतदार आपले मतदार यादीतील नाव, आपला भाग क्रमांक, मतदार क्रमांक तसेच मतदार केंद्राचे ठिकाण ही माहिती अगदी सहजगत्या उपलब्ध करुन घेऊ शकतो.
सदरची माहितीपत्रके आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी वितरीत केली जात असून प्रत्येकाने 20 नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत प्रत्येक मतदारापर्यंत त्याचा भाग क्रमांक, मतदार क्रमांक आणि त्याचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे अशी संपूर्ण माहिती असलेली मतदार चिठ्ठी पोहचविली जात आहे.
या माध्यमातून विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही मतदारांपर्यंत थेट पोहचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
