उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
धाराशिव : आज सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची बॅग औसा येथे हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. याचा संताप उद्धव ठाकरेंनी लोहारा येथील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करीत व्यक्त केला. शिंदे- फडणवीस यांच्या सांगण्यावरून मला चेकिंगवर टाकलं आहे… अरे, मिंध्याच्या माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरू नकोस असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
सोमवारी वणीमध्ये तर आज मंगळवारी औशामध्ये ठाकरेंच्या बॅगची झाडाझडती घेण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. बॅग तपासायला हरकत नाही मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे. मात्र माझी बॅग तपासता तशी मोदींची बॅग तपासणार का ? असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला. लोहारा येथील शिवसेना उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.”
उद्धव ठाकरेंची मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसामध्ये सभा होती. तिथं हेलिकॉप्टरनं पोहोचण्याआधीच निवडणूक आयोगाचं पथक सज्ज होते. हेलिकॉप्टर लँड झाल्यावर लगेचच बॅगांची तपासणी सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडीओ बनवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासा, असं आव्हान उद्धव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं. अपेक्षेप्रमाणं औसाच्या सभेत देखील ठाकरेंनी बॅग तपासल्याचा उल्लेख केला.
गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून फाफडा घेऊन येतात का असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत असा सवालही संजय राऊत यांनी केला.
सत्तेचा दुरुपयोग सुरू असून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला. विरोधकांच्या या गोष्टीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले.
