फटाके आणि दिवाळी हे समीकरणच आहे. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात त्यामुळे वायू प्रदूषण तर होतेच पण त्यासोबतच ध्वनी प्रदुषण देखील होते. फटाक्यांचे केवळ इतकेच दुष्परिणाम आहेत असे नाही तर याशिवायही अनेक दुष्परिणाम फटाक्यांमुळे होतात म्हणूनच दरवर्षी दिवाळी आली की शासकीय यंत्रणा, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच पर्यावरणवादी संघटना नागरिकांना दिवाळीत जास्त फटाके वाजवू नका असे आव्हान करतात. फटाकेमुक्त दिवाळी साजरी साजरी व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शाळा, कॉलेजमधून त्याबाबत जनजागृती केली जाते. फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात आणि ते योग्यही आहे, त्याची गरजही आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे ही काळाचीच गरज आहे. फटाक्यांमुळे अनेक दुष्परिणाम होतात. सरकारी यंत्रणा, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच पर्यावरणवादी संघटनांच्या आव्हानांना आणि प्रयत्नांना बऱ्यापैकी यश ही मिळत आहे. यावर्षी दिवाळीत फटाके वाजले मात्र मागील वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी होते. फटक्यांबाबत नागरिकांची जनजागृती होतेय ही अतिशय चांगली गोष्ट आहे. फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत नागरिक जागरूक होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे याबाबत सरकारी यंत्रणा, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच पर्यावरणवादी संघटनांचे अभिनंदनच करायला हवे तसेच नागरिकांचेही आभार मानावे लागेल. नागरिकांनी दिवाळीत फटक्यांबाबात जी जागरूकता दाखवली ती इतर वेळेसही दाखवायला हवी. कारण आपल्या देशात केवळ दिवाळीतच फटाके वाजवले जातात असे नाही तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणांनी फटाके वाजवले जातात मग तो सण उत्सव असो की आनंदाचं प्रसंग. फटाके वाजवूनच सण – उत्सव, आनंदाचे क्षण साजरे करण्याची प्रथाच पडली आहे. काही लोक नवीन वर्षाचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करतात. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री कानठळ्या बसतील इतकी फटाके वाजवली जातात. थर्टी फर्स्ट साजरा करताना उन्माद दाखवण्याच्या खटाटोपात नागरिक फटकेबाजी करतात. नाताळच्या रात्रीही फटाके वाजवले जातात. ईदच्या दिवशी चांद दिसला की फटाके वाजवली जातात. वाढदिवस साजरा करताना फटाके वाजवण्याचे फॅड हल्ली सुरू झाले आहे. लग्नातही फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. दिवाळीत फटाके वाजवू नका असे आव्हान करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या राजकीय मेळाव्यात, विजयी मिरवणुकांतही फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी होते. दिवाळीत जास्त फटाके वाजू नयेत यासाठी प्रयत्न करणारे या इतर वेळी केल्या जाणाऱ्या फटाकेबाजीकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करतात. दिवाळीच्या पाच दिवसांच्या फटाक्यांमुळे जे दुष्परिणाम होतात तेच इतर वेळेच्या फटाकेबाजीतही होतात. त्यामुळे या इतर वेळेच्या फटाक्यांच्या आतषबाजीवर देखील बंधने घातली पाहिजेत. नागरिकांनीही फटाके वाजवूनच आनंद साजरा केला पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी. नागरिकांनी फटक्यांबाबत जी जागरूकता दिवाळीत दाखवली ती वर्षभर दाखवायला हवी.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *