उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
योगेश चांदेकर
पालघरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागातील भरारी पथकाने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलासरी तालुक्यात केलेल्या तपासणीत विदेशी मद्याच्या मोठया आकाराच्या ३६४ बाटल्या जप्त केल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक तालूके हा गुजरात, दीव दमण तसेच दादरा-नगर हवेलीला लागून असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य महाराष्ट्रात येत असते. विधानसभेच्या निवडणुकीत पालघर जिल्ह्यातही अशा मद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असतो.
पाठलाग करून साडेदहा लाखांचा ऐवज जप्त
गेल्या दोन महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारच्या अवैध मद्याची वाहतूक, साठा व विक्री प्रकरणी कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे तलासरी तालुक्यात अशा प्रकारची मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनांची तपासणी केली. वाहन तपासणी होत असल्याने दादरा नगर हवेली पासिंग असलेल्या डीएन ०९/४७३ क्रमांकाच्या स्विफ्ट मारुती कारचालकाने वेगात गाडी नेली. तिचा पाठलाग करून पोलिसांनी मारुती मोटारीसह दहा लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यात साडेतीन लाख रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. यामधील आरोपी मात्र फरार झाला आहे.
यांनी केली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक ए. एस चव्हाण, विश्वजीत आभाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, ए. एम. शेख, कमलेश पेंदाम आदींनी तलासरी तालुक्यातील ठाकरपाडा रोड, कुर्झे डॅम जवळ ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुद्ध विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघरचे अधीक्षक सुधाकर कदम, बी. एन. भुतकर आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे हे करीत आहेत.
00000