मुरबाड : ग्रामीण रुग्णालयात बुधवारी पाच खाटांचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले. ट्रॉमा केअर सेंटरचे इमारतीमध्येच हे केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी दररोज वीस रुग्णांना डायलिसिसची सेवा मोफत देण्यात येईल, अशी माहिती मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यातील रुग्णांना डायलिसिस सेवेची गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा संख्येने डायलिसिस केंद्र नसल्याचे लक्षात घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू केले आहेत. या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. त्यामुळे आता मुरबाड तालुक्यातील रुग्णांना डायलिसिससाठी इतरत्र शहरात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
रुग्णालयातील सेंटरमध्ये मोफत डायलिसिस होणार आहे. या विनामूल्य डायलिसिस सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे. यावेळी किडनी विकारतज्ज्ञ डॉ. अनिकेत, जगन्नाथ, डॉ. संग्राम डांगे, डॉ. सुनील विश्वकर्मा, सहाय्यक अधीक्षक माणिक गायकवाड, परिसेविका जयश्री चौधरी, तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.