विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केल्याची टीका
योगेश चांदेकर
पालघरः डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघातील गाव व पाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन प्रचार मोहीम राबवण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रचारात सामाजिक कार्यकर्ते, धर्मनिरपेक्षतेशी बांधीलकी असणारे नेते उतरले आहेत.
जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून आ. निकोले यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी गेल्या; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. वर्षानुवर्षे जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून ती जिंकणाऱ्या आमदार निकोले यांचे आकर्षण केवळ पालघर जिल्ह्यालाच आहे, असे नाही, तर संपूर्ण राज्याला आहे. केवळ साधा, गरीब आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे, असे नाही, तर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आ. निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात.
महायुतीला प्रत्युत्तर
महायुतीने या मतदारसंघातून विनोद मेढा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यांनी डाव्यांवर टीका केली. आ. निकोले यांच्यावरही विकासात अडथळे आणीत असल्याचा आरोप केला. त्यावर निकोले यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन महायुतीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीसह अन्य सामाजिक संस्थांचे कार्यकते, चळवळीतील नेते निकोले यांच्या प्रचारात उतरले आहेत. वाढवण बंदराला विरोध कायम ठेवताना भाजपचे नेते जनतेची कशी दिशाभूल करतात, यावर प्रचारात भर दिला जात आहे.
झूट, लूट, फूट सरकार!
दरम्यान, ‘भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी सरकारवर “झूट, लूट, फूट सरकार” असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. “लोकशाहीत विचारांची ताकद आहे, पैशांची नव्हे,” असे सांगत खोटे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आदिवासींवर अन्याय करता आणि राष्ट्रपती केल्याचे ढोल बडवता
राज्य समन्वयक उल्का महाजन म्हणाल्या, की गद्दारांनी देशाचे तुकडे करण्याचा डाव आखला आहे. अशा लोकांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही राजकीय पक्षाशी न जोडता, आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हक्कांसाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी तयार केलेल्या अत्याचार प्रतिबंधक कायदा व पेसा कायद्याचे महत्व आहे; मात्र विविध प्रकल्पांच्या माध्यमातून या कायद्यांची पायमल्ली होत आहे. “छत्तीसगड आणि मणिपूरमध्ये आदिवासींवर अन्याय चालू असताना, आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने काय फरक पडतो ?” असा सवाल त्यांनी केला.
विचाराच्या ताकदीने लढाई जिंकू
आ. निकोले यांनी भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांवर जोरदार टीका केली. “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. पैशाच्या जोरावर नव्हे, तर विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे.” असे ते म्हणाले.
महिलांसाठी स्वतंत्र सभा
निकोले यांच्या प्रचारासाठी तलासरी तालुक्यातील डोंगारी (संभा जिल्हा परिषद गट), डहाणू तालुक्यातील खुनवडे (बोर्डी जिल्हा परिषद गट) आणि कैनाड जिल्हा परिषद गटातील वाकी येथे सभा झाल्या. वाकी येथे महिलांसाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मरियम ढवळे, किरण गहला, लक्ष्मण डोंबरे, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश खरपडे, शुक्र्या उंबरसाडा चंद्रकांत घोरखना आदींनी सभा गाजवल्या.
पथनाट्यातून प्रचार
‘एसएफआय’ आणि ‘डीवायएफआय’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय पथनाट्य सादर केले. समाजातील विविध समस्या, ग्रामीण भागातील विकासाची आवश्यकता, महिला सक्षमीकरण, तसेच तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या पथनाट्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. आमदार निकोले यांनी डहाणूतील जनतेसाठी सुरू केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी रोजगारनिर्मिती, शिक्षणाच्या सोयीसुविधा, आदिवासींचे हक्क व जमिनीच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.
00000