एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीला पुरवण्यात आलेल्या समोस्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आता बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या बर्फाच्या लाद्या सरबत, ज्यूस, बर्फाचा गोळा बनवणाऱ्या दुकानदारांना पुरवण्यात येत होत्या. मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, लिंबू सरबत, फळांचा ज्यूस इत्यादी पिण्यामुळे नागरिकांना जो त्रास झाला असता त्याला जबाबदार कोण असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्थात हे पहिल्यांदाच झाले असेही नाही. दरवर्षी उन्हाळ्यात असा प्रकार उघड होतो. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार घडला होता. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनच्या फलाटावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत तयार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये लिंबू सरबत तयार करण्यासाठी विक्रेता अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याचे अगदी स्पष्ट दिसत होते. मागील वर्षाची ही घटना किंवा आताची उंदीर मेलेल्या बर्फाच्या लादीची तसेच समोस्याची घटना पाहता रस्त्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरांच्या रस्त्यारस्त्यांवर लिंबू सरबत, बर्फाचा गोळा विकणाऱ्या हातगाड्या उभ्या असतात. उन्हाळा असल्याने नागरिकही या हातगाड्यांवरील सरबत व बर्फाचा गोळा विकत घेऊन खातात, त्यामुळे शरीरास तात्पुरता थंडावा जरी मिळत असला तरी ते शरीरास बाधक असते अस्वच्छ पाणी दूषित बर्फ यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. बर्फ बनवत असलेल्या कारखान्यांमधील हलगर्जीपणा किंवा जिथे बर्फ साठवला जातो तिथे उंदीर घुशींचा राबता असू शकतो त्यामुळे असे प्रकार घडतात. त्यामुळेच बर्फ कारखाने आणि बर्फ साठवण्याच्या जागेची कसून तपासणी होणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग तसेच प्रशासनाने बर्फ कारखाने तसेच रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या गाड्यांची तपासणी करायला हवी. तेथील स्वच्छतेचीही कसून तपासणी करायला हवी. दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. बर्फ, पाणी यासोबतच रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची देखील कसून तपासणी व्हायला हवी. रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या गाड्यांवरील खाद्यपदार्थांच्या दर्जांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतो. या खाद्य पदार्थांची देखील वेळोवेळी तपासणी व्हायला हवी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.