डोंबिवली : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात खासदार हेमंत गोडसे यांच्या नावासोबतच अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आहे. अजय बोरस्ते यांनी ठाणे येथे चैत्र नवरात्रोत्सव निमित्त ठाण्यात आले होते.
त्या पाठोपाठ आता हेमंत गोडसे यांनी देखील कल्याण मध्ये येऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा जेणेकरून उमेदवार आपल्या प्रचारात लागतील अशी विनंती आहे त्यांना करणार असल्याचे यावेळी गोडसे यांनी सांगितले.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत हेमंत गोडसे व छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या दोघांच्या नावाची नाराजी असल्यामुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. महायुतीकडून भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली आहे.
बोरस्ते यांनी ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सव निमित्त ठाण्यात हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन झाले पाहिजे. तसेच ठाण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही असे होणार नाही. असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ आता हेमंत गोडसे देखील ठाण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री कल्याण येथे येत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गोडसे म्हणाले, महाविकास आघाडीचे जसे उमेदवार जाहीर झाले आहेत. तसेच महायुतीच्या ज्या उर्वरित जागा राहिल्या आहेत त्यावर लवकर तोडगा निघाला तर ते उमेदवार देखील प्रचाराला सुरुवात करतील.
महायुतीचा उमेदवार प्रचारात मागे पडायला नको म्हणून लवकरात लवकर यावर निर्णय झाला पाहिजे असे वाटते. जागा वाटपाचा निर्णय जरी शेवटच्या टप्प्यामध्ये असला तरी, आता संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे अतिशय वेगाने वाहू लागलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय व्हावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत असे सांगितले.
शिवसेनेकडून बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे, ते ठाण्यात देखील आलेले आहेत यावर गोडसे म्हणाले, मला वाटतं अद्याप जागा कोणाला सोडायची हाच तिढा सुटलेला नाही. परंतु हा जागेचा तिढा लवकरात लवकर सुटून जागावाटप निश्चित व्हावं. त्यानंतर उमेदवार देण्याचं काम होईल. पक्षातील मुख्य नेते वरिष्ठ त्या ठिकाणी करतील. मुख्यमंत्री तसेच आमचे सहकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत. ते देखील या संदर्भात चर्चा करणार आहेत.
या संदर्भात आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील. अजय बोरस्ते यांनी देखील प्रसार माध्यमांना सांगितल आहे की, ती जागा शिवसेनेला सुटावी यासाठी आग्रही आहोत. आणि त्यानंतर हेमंत गोडसे यांच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत असेही सांगितले आहे.
छगन भुजबळ यांच्या विषयी गोडसे म्हणाले, तसा काही प्रश्न उद्भवत नाही. निवडणुका शेवटच्या टप्प्यात असल्या कारणाने ही सर्व अडचणी आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. म्हणून प्रत्येकाला उत्कंठा लागली आहे की, आपल्याही जागेवर निर्णय व्हावा. लवकरात लवकर महाविकास आघाडीचे जसे उमेदवार जाहीर झाले. तसेच महायुतीच्या ज्या उर्वरित जागा राहिल्या आहेत त्यावर लवकर तोडगा निघाला तर ते देखील प्रचाराला सुरुवात करतील असे गोडसे म्हणाले. खासदार श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडस यांच्या भेटीनंतर नाशिकच्या जागेवर नक्की काय तोडगा निघतो हे आता पहावे लागेल.