थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची १५ नोव्हेंबर रोजी ४२ वी पुण्यतिथी होती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विनायक नरहर भावे असे होते. आचार्य ही त्यांना मिळालेली पदवी आहे. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील वाई हे आहे. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. तिथे त्यांचे आजोबा आणि आईने त्यांच्यावर धर्मपरायणतेचे संस्कार केले. वाई मुक्कामी विनोबा भावे यांनी स्वामी केवलानंद सरस्वतीच्या चरणांशी उपनिषदे, ब्रह्मसुत्रे, शंकरभाष्ये व पतांजलीचे शिक्षण घेतले. पुढे नोकरीनिमित्त त्यांचे वडील बडोदा येथे गेले. तिथेच त्यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण झाले. तिथे त्यांनी संस्कृत, फ्रेंच भाषेचा आणि इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला निघाले. पण वाटेतच सुरतेस उतरुन आई वडिलांना न कळवता ते वाराणसी येथे निघाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते हिमालय आणि बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी महात्मा गांधींचे भाषण ऐकले आणि त्या भाषणाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती या दोन्हींच्या प्रेरणा त्यांना महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्वात आढळल्या. ७ जून १९१६ रोजी कोरचब आश्रमात त्यांनी गांधीजींची भेट घेतली. या भेटीतच त्यांनी ब्रह्मचार्यांची शपथ घेतली आणि जीवनसाधनेस सुरवात केली. तिथे ते सूतकताई शिकले. १९२१ रोजी जमनालाल बजाज यांनी साबरमती आश्रमाची शाखा वर्ध्यास काढली तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी त्यांनी जबाबदारी स्वीकारली. भगवत गीतेचे सार त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ शैलीत गीताई आणि मधुकर या ग्रंथातुन मांडले. त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे भूदान चळवळ. मोठ्या जमीनदारांकडून जमीन घेऊन त्यांनी त्या भूमिहीनांना दिल्या. भूदान आंदोलनासाठी त्यांनी देशभर यात्रा काढली. गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वोदय योजना सुरू केली. १९३०-३२ च्या कायदेभंग चळवळीत कारावास भोगलेले विनोबा भावे महात्माजींच्या १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधींनी निवडलेले पहिले सत्याग्रही होते. १९५१ ते १९५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य त्यांनी वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. समाजाला मानव धर्माचे शिक्षण देणाऱ्या या सत्पुरुषाचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले. आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५