कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम

 

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि त्याच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत, शनिवारी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रे, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळवा येथील मतदान केंद्र परिसरात साफसफाई केली. तसेच, यावेळी मतदान करणे आणि स्वच्छता राखणे याची शपथही घेण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, प्रभाग समिती मधील स्वच्छता निरीक्षक यांनी या सफाई मोहिमेत सहभाग घेतला.

एकूण ३६७ ठिकाणी १५२८ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी १३९० कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. उद्या, रविवार, १७ नोव्हेंबर रोजी मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. तर, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर- सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *