प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास
मुरबाड : मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली. पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडविता आले नाहीत. बदलापूरातील `त्या’ घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे ठरविले आहे. मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोरील मैदानात भव्य सभा झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. या वेळी लोकनेते गोटीराम पवार, कॉंग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोझा, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा घुडे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, रश्मी निमसे, कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रवक्ते महेश चौघुले, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय (सेक्यूलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगारनिर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे म्हटले.
भाजपा हा संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला १८ व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात ४८ ठिकाणी सभा घेतल्यानंतर राज्यातील जनतेने पक्षफुटीबद्दल भाजपाला शिक्षा करण्याचे ठरविले असल्याचे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड मतदारसंघातील केळेवाडी येथील रस्त्याचे काम १५ वर्षात झाले नाही. या भागाला हेतुपुरस्सर टार्गेट करण्यात आले. काळू धरणाला विरोध असल्याचे सांगून, त्यांच्या बगलबच्च्यांकडून काळू धरणक्षेत्रातील गावांमध्ये घरपट्टीच्या पावत्या घेतल्या जात आहेत. जोता नसतानाही घर दाखवून लूट केली जात आहे. मुरबाड तालुक्याचा संबंध नसलेला समृद्धी महामार्ग हा अहवालात छापला गेला. वडोदरा एक्सप्रेसवेच्या बोगद्यात जाऊन फोटो काढले गेले. खोटे बोला पण रेटून बोला, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, असा आरोप सुभाष पवार यांनी केला.मुरबाड मतदारसंघातील १५ वर्षांचा आमदार निधी हा उद्यान सुशोभिकरण व बाकड्यांमध्ये खर्च झाला. १५ वर्षांपासून अरेरावी व दादागिरी सुरू असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. तब्बल १५ वर्ष आमसभा न घेण्याचा पराक्रमही नोंदविला गेला, अशी टीका सुभाष पवार यांनी केली.
जनसेवा शिक्षण मंडळाला आपण तीन लाख रुपयांची अनामत रक्कम दिली असताना, माझ्याविरोधात संस्थेकडून पैसे घेतल्याचा खोटा प्रचार केला. त्यांना संस्थेचा कारभार माहिती नाही, असा टोला सुभाष पवार यांनी मारला. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सेम नावाचा उमेदवार उभा केला गेला. मात्र, आताची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. जनतेसह कार्यकर्त्यांनीही परिवर्तनासाठी लढाई सुरू केली आहे. त्यामुळे परिवर्तन नक्कीच होईल, असा विश्वास सुभाष पवार यांनी व्यक्त केला.
चौकट
`सरकारचे शेवटचे पाच दिवस राहिलेत’
बदलापूर शहरासह मुरबाड मतदारसंघात बड्या माफियांच्या माध्यमातून दमबाजी करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी निष्पक्ष व समान भूमिका घ्यावी, असे आवाहन करतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांना आता या सरकारचे पाच दिवस राहिले आहेत, असा हसत हसत इशारा दिला.
