डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सवाल

योगेश चांदेकर

पालघरः राज्यात विधानसभेच्या ४० मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीने घर न घर पिंजून काढले आहे, अशी माहिती देताना महायुतीच्या सर्व संकल्पना काँग्रेसने चोरल्या असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी केला. १९९९ पासून २०१४ पर्यंत आणि २०१९ मध्ये उद्धव ठाकरे असे आघाडीचे कितीतरी मुख्यमंत्री झाले. त्या वेळी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी एक रुपयाही का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. राज्यात सत्तेत येण्याचे स्वप्न आता महाविकास आघाडीने सोडून देऊन विरोधी पक्ष नेता कोण, हे ठरवावे असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. गोऱ्हे यांनी आज पालघर विधानसभा मतदारसंघात हजेरी लावली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित, जिल्हाप्रमुख कुंदन संखे शिवसेना प्रवक्ते केदार काळे, वैदही वाढान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

महिलांच्या हिताचे महायुतीचे निर्णय

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की महिलांनी कोणतेही आंदोलन न करता महिलांचे प्रश्न कोणते आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विचार करून महिलांच्या विकासाच्या अनेक योजना राबवल्या. महिलांसाठी चौथे धोरण जाहीर केले. लाडकी बहीण योजना, लाडकी मुलगी योजना, आनंदाचा शिधा, मुलींना मोफत शिक्षण, प्रवासात पन्नास टक्के सवलत, लखपती दीदी योजना अशा कितीतरी योजना महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी आणल्या आहेत. या योजनांमुळे महिलांच्या विकासाला हातभार लागणार आहे.

महिलांच्या योजना पोचवल्या घरोघर

महिलांसाठीच्या योजना शिवसेना महिला आघाडी राज्यातील ४० मतदारसंघात घरोघरी पोहोचवत आहे. घराघरांत त्यासाठी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० मतदारसंघात महिलांनी घरोघरी संपर्क केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा महिलांना किती फायदा झाला, त्या कशा उपयुक्त आहेत याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून या योजनांपासून कुणी वंचित राहिले आहे का, त्यांच्यासाठी नव्याने काय करता येईल, याचा आढावाही महिला आघाडी घेत आहे.

योजनांना प्रतिसाद पाहून चोरी

राज्यात राज्य सरकारने महिलांसाठी केलेली कामे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या योजनांमुळे महिलांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याचे पाहून आणि या योजनांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून काँग्रेसने आता आमच्याच योजना चोरून नव्याने त्या जाहीरनाम्यात घेतल्या आहेत, असा आरोप करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षाच्या काळात होते. या काळात काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सर्वांच्या काळात महिलांच्या हिताची एकही योजना त्यांना आणता आली नाही. महिलांना एक रुपया तरी देता आला का, असा सवाल त्यांनी केला.

 

ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात

उमेदवार आयातीबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची महायुती आहे. या महायुतीतील एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांनी उमेदवारी घेतली असेल, तर हे काय ताटातील वाटीत आणि वाटीतले ताटात गेल्यासारखे आहे. त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही. महायुतीलाच फायदा होत असेल, तर असे पक्षांतर होत असते.

 

पुन्हा महायुतीचेच सरकार

राज्यात आम्ही अनेक दौरे केले. त्यातून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असून आता महाविकास आघाडीने सत्तेत  येण्याचे स्वप्न सोडून देऊन विरोधी पक्ष नेता कोण होईल हे अगोदर ठरवावे, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *