अनिल ठाणेकर
ठाणे : गद्दार विरुद्ध खुद्दार हाच या विधानसभा निवडणुकीतील मुद्दा आहे. यामुळेच प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील या लढाईत निष्ठावंत म्हणून मतदार मलाच निवडून देतील, असा दावा ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांनी उभारलेला एकही प्रोजेक्ट कायदेशीर नाही, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हेराफेरी झालेली आहे. उदा. भाईंदर पाडा येथील जागा ही ग्रीन झोन होती. या जागेवर महापालिकेतील आपले हितसंबंध वापरुन या जागेवर संयुक्त स्मशानभूमीचे रिझर्व्हेशन टाकले गेले. यामुळे या जागेवर ०.५ चा २ एफएसआय झाला. सात एकरवरील ही संयुक्त स्मशानभूमी हिंदू, शिया मुस्लिम, सुन्नी मुस्लिम, .लिंगायत, ख्रिश्चन अशा विविध धर्मीय लोकांसाठी उभारली जाणार होती. या संयुक्त स्मशानभूमीचे सहा वर्षापूर्वी उद्घाटनही झाले होते पण आजतागायत तेथे काहीही झालेले नाही. कारण स्मशानभूमी झाली तर शेजारीच असलेल्या सरनाईक यांच्या सुरु असलेल्या बिल्डिंग प्रोजेक्टवर याचा परिणाम होईल. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर लोकांना एकत्र करून इथे स्मशानभूमी नको म्हणून तेच आंदोलन करतील, ही सरनाईक यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे एक उदाहरण आहे. राज्य सरकारचा जितकाही निधी आला तो स्वतःच्या प्रोजेक्टचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासठी त्यांनी वापरला. गेली १० वर्ष याविरोधात मी सतत विविध मार्गाने, विविध स्तरांवर आवाज उठवत आलेलो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जनतेच्या हिताचे काॅमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आम्ही उभे आहोत पण आमचा मुळ हिंदूत्ववादी अजेंडा आजही कायम आहे. पिण्यायोग्य पाणी, वाहतूक कोंडीतून सुटका, सरकारी दवाखाने व रुग्णालय या हेल्थ सुविधा सक्षम करणे, सरकारी शाळा दर्जेदार करणे, नागरिक व महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सर्वस्तरावर सक्षम नागरी सुविधा देणे, रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शन व मदत आदी माझा निवडणूक जाहिरनामा आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून जे गद्दार आमदार-खासदार पक्ष फोडून बाहेर पडले त्यात एक नाव प्रताप सरनाईक यांचेही होते. ही गोष्ट लोकांना आवडलेली नाही. ती बाब लोकांच्या मनात कायमची कोरली गेलेली आहे. तसेच प्रताप सरनाईक यांनी सत्तेच्या भ्रष्ट मार्गाने वाढविलेली संपत्ती लोकांना दिसत आहे. याचा राग मतदारांच्या मनात कायम आहे. या विधानसभा निवडणुकीत सरनाईक यांच्याविरोधात माझ्यारुपाने प्रथमच समर्थ व सक्षम पर्याय उभा राहिल्याने लोक मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील अशी आशा नरेश मणेरा यांनी व्यक्त केला.
