महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील राजकारण खोके, गद्दार, धडा शिकवणार, करेक्ट कार्यक्रम करणार याभोवतीच फिरली. बराच वेळ मराठा आरक्षणाला कुरवाळण्यात गेला. भरीला लाडकी बहीण आहेच. हे सारे पाहता या नेत्यांना खरोखरीच जनतेच्या कल्याणाची काही चाड आहे का, असा प्रश्न उभा राहिल्यास आश्चर्य नाही. निवडणुकांची धामधुम सुरू झाली आणि नेत्यांची खरी रुपे जनतेच्या डोळ्यासमोर येऊ लागली. तिकीट मिळाले नाही म्हणून धाय मोकलून रडणारे, घरातून गायब होणारे, नाराज होऊन पक्ष बदलणारे आणि बंड पुकारून स्वत:च्याच पक्षाविरुद्ध उभे राहणारे नेते पाहून आपण नेमके कुणाला आणि का निवडून देत आहोत, हे सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. आपल्या पक्षाशी आणि पक्षविचारांशी कोणतेही देणे घेणे नसलेल्या या उमेदवारांना जनतेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी सत्ता हवी आहे हे न कळायला जनता मूर्ख नाही.
जनतेच्या कल्याणासाठी सत्ता मागणारे हे नेते नक्की जनतेला काय देणार आहेत? निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने अत्यंत आकर्षक ‌‘जाहीरनामा‌’ प्रसिद्ध केला आहे. कुणी ब्लूप्रिंट तयार करून लोकांसमोर मांडली आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित, मनसे असे अनेक लहानमोठे पक्ष आता कामाला लागले आहेत. येनकेनप्रकारेन लोकांना आकर्षित करायचे एकमेव ध्येय समोर असल्यामुळे आश्वासनांची मनसोक्त खैरात सुरु आहे. जुन्याच विषयांना पुन्हा उजाळा देऊन हे जाहीरनामे लोकांच्या समोर झळकवले जात आहेत. जे पक्ष काही दिवसांपूर्वी ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेला विरोध करत होते, त्यांनी आता लाडक्या बहिणींना द्यायची रक्कम वाढवली आहे. गरीबांना घरे, कमी किमतीत वीज, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुलींप्रमाणेच मुलांनाही उच्च शिक्षण फुकट यासारख्या एकापेक्षा एक रेवडी योजना जाहीर होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधू, संविधानाचे रक्षण करू असेही कुणी म्हणत आहे. पण काही करण्यापेक्षा दुसरा किती वाईट आहे हे सांगण्यातच अनेकजण आपली अधिक शक्ती खर्च करत आहेत. जातीपाती नको म्हणता म्हणता आता सारेच जातीचे राजकारण करू लागले आहेत.
या भूलभुलैयाचे प्रत्यक्षात काय होते? जनतेला दाखवली गेलेली ही स्वप्ने खरी होतात का? स्पष्ट सांगायचे तर उत्तर ‌‘नाही‌’ असेच आहे. कारण तिथे सत्ताधारी पक्षाची इच्छाशक्ती कमी पडते. त्याचबरोबर सत्तेवर येणाऱ्या पक्षाला काहीही काम करू न देण्याची शपथ घेणारा विरोधी पक्ष पुन्हा नव्या जोमाने आणि ताकदीने उभा राहतो आणि विरोधासाठी विरोध करत राहतो. पण खरेच लोकांना हे हवे आहे? आजवर झाले तेच आणि तसेच? खरेच का लोकांना या रेवडी योजना हव्या आहेत का? मुळात योजना अपेक्षित वर्गापर्यंत पोचतात का? बरेचदा तर त्यातील पळवाटा शोधून गरज नसलेल्या लोकांची घरे भरली जातात. हे सारे बंद व्हायला हवे. कारण लोकांना खरोखरच या फुकट योजना नको आहेत. त्यांना काही तरी ठोस हवे आहे. काही काळ चालू राहून नंतर बंद पडणारे कोणतेही फायदे मिळवण्यापेक्षा कायम उपयोगी ठरेल असे काही लोकांना हवे आहे. तसे पाहिले तर लोकांच्या अपेक्षा खूप कमी आहेत. त्यांना साधेसुधे आणि शांत जीवन हवे आहे. मोकळी आणि शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सकस अन्न हवे आहे. चांगले शिक्षण हवे आहे. केवळ मुंबई किंवा पुण्यासारख्या कोंडलेल्या शहरात नव्हे तर जो जिथे राहतो तिथेच त्याला शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी हव्या आहेत. प्रवासासाठी विनाखड्ड्यांचे रस्ते हवे आहेत. गरज पडेल तेव्हा उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा हव्या आहेत. शहरात जागोजागी भरपूर झाडे आणि बगीचे हवे आहेत.
थोडक्यात, जगण्यासाठी आवश्यक ते लोकांना हवे आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ आणि अतीज्येष्ठ या प्रत्येकालाच सहज आणि सुखद जगण्यासाठी या किमान गोष्टी हव्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे यासाठी कष्ट करायला जनता तयार आहे. आयत्या मिळणाऱ्या पैशांपेक्षा त्यांना स्वत: मेहनत करून जगायला अधिक आवडणार आहे. त्यांना माणसासारखे जगायचे आहे. जगण्याचा आनंद घ्यायचा आहे. लोकांना सुरक्षा हवी आहे. लहान मुलांना आणि महिलांना मोकळेपणाने जगण्याची संधी हवी आहे. शाळांच्या जवळपास, त्यांना आवडणाऱ्या गोळ्या चॉकलेट्सच्या माध्यमातून लहान मुलांना ड्रग्सच्या नादी लावणाऱ्या समाजविघातकांपासून सुरक्षा हवी आहे. विनयभंग आणि बलात्कारासारख्या संकटांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना आणि मुलींना त्या क्रूर नराधमांपासून सुरक्षा हवी आहे. गैरव्यवहार करणारा, मग तो कुणीही असो, योग्य शिक्षा आणि तीही लवकरात लवकर झाली पाहिजे ही आज लोकांची अपेक्षा आहे. गुन्हे आणि अपराध करणाऱ्याला पाठीशी घालणारा कुणीही असो, शिक्षा झालीच पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. आपण निवडून देत असलेल्या उमेदवारांचे चारित्र्य स्वच्छ असावे, त्यांना खरोखरीच देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीची तळमळ असायला हवी, अशी लोकांची अपेक्षा आहे. खरा आणि कोणत्याही दबावाशिवाय मिळणारा न्याय लोकांना हवा आहे.
लोकांना नेमके काय हवे आहे हे आपल्या राजनेत्यांना माहीत आहे. कारण अखेरीस तेदेखील याच समाजाचा एक भाग आहेत. लोक कसे जगतात हे त्यांना माहीत आहे. लोकांच्या नेमक्या अडचणी आणि प्रश्न त्यांना माहीत आहेत. गेली अनेक वर्षे ही आणि अशाच प्रकारची आश्वासने देऊन ते निवडून येत आहेत. कारण निवडून आल्यावर आपल्याला फारसे काही करायचेच नाही, हे त्यांना माहीत आहे. लोक ओरडतात. अलीकडे माध्यमांचा वापर करूनजास्त काळ ओरडतात आणि मग वाट्याला आलेले स्वीकारून पुन्हा एकदा नित्य जगण्याची धडपड सुरू करतात हे त्यांना माहीत आहे. निवडणुका येतात आणि जातात. कुणी जिंकतात. कुणी हरतात. कुणी सत्तेवर येतात. कुणी विरोधी पक्षात बसतात. पण मग लोकांचे आणि जनतेचे कल्याण करण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेले हे नेते आणि आमदार नक्की काय करणार आहेत? पुन्हा एकदा मागील पानावरून तसेच सारे चालू राहणार असेल तर ही निवडणुकीची नाटके आणि एवढा प्रचंड खर्च करायचाच कशासाठी? हे कुठे तरी थांबायला हवे. नवी सुरुवात व्हायला हवी. आपण ज्या शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे आणि इतर अनेक आदर्श राज्यकर्त्यांचे दाखले देतो, त्यांना खरोखरीच अभिप्रेत असलेला राज्यकारभार करण्याची निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या आणि ती जिंकणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असायला हवी.
एके काळी महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाई. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उत्कृष्ट होती. नोकरीच्या अगणित संधी उपलब्ध होत्या. शिक्षणाचा दर्जा उत्तम होता. त्यामुळे इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात येऊन स्थायिक होणे अभिमानाचे वाटे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे सारे बदलत चालले आहे. याला जबाबदार कोण हा वाद घालण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. आता गरज आहे ती ज्यांना सत्ता हवी आहे, त्यांनी लोकांना नेमके काय हवे आहे याचा गंभीरपणे विचार करण्याची. नेमकी प्रगती साधण्यासाठी या नेत्यांनी दीर्घकालीन उपाययोजनांकडे लक्ष देण्याची आणि लोकांनी आपल्याला निवडून द्यावे यासाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करण्याची गरज आहे. कारण लोक आता शहाणे झाले आहेत. कुणाला सत्तेवर बसवायचे आणि कुणाला दूर लोटायचे हे त्यांना माहीत आहे. ‌‘जनतेचा आवाज‌’ म्हणून स्वत:चे म्हणणे पुढे रेटणारे लोक आता जनतेला नको आहेत. त्यांना हवे आहेत, खरोखरीच त्यांच्यासाठी कामे करणारे आमदार आणि मंत्री. घासून गुळगुळीत झालेली भाषा बोलणारे आणि तेच ते विषय मांडणारे उमेदवार त्यांना नको आहेत. त्यांना हवे आहेत प्रत्यक्ष कामे करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने पुढे नेणारे नेते. एकमेकांवर चिखलफेक करून आणि आरोपांची राळ उडवून कुणीही मोठे होत नाही, हे राजकीय नेत्यांना समजावून सांगायची वेळ आली आहे. प्रगती सर्वांनी मिळून करता येते, हे लक्षात घेणारे लोक आता हवे आहेत. जागृत झालेली जनता असे नेते निवडून आणण्यास सक्षम होवो, हीच अपेक्षा आता करायची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *