अनिल ठाणेकर
डहाणू : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू (अज) मतदारसंघातील माकप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासाठी निवडणूक सभांना संबोधित केले. तलासरी तालुक्यातील वसा आणि डहाणू तालुक्यातील वाकी येथे चांगल्या जाहीर सभा झाल्या. डहाणू तालुक्यातील आशागड येथे आदिवासी महिलांची सभा झाली.यावेळी विनोद निकोले यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, चंद्रकांत घोरखाना, अनंता खुलात, लहानी दौडा, सुनिता शिंगडा, प्राची हातिवलेकर, शिवसेनेचे संजय पाटील, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनीही सभांना संबोधित केले.
वृंदा करात यांनी महाराष्ट्रातील पक्ष आणि किसान सभेचे अत्यंत ज्येष्ठ नेते, माजी खासदार (१९७७च्या आणीबाणीनंतरच्या ऐतिहासिक निवडणुकीत लोकसभेवर निवडून आलेले) आणि माजी आमदार (१९८०, १९८५ आणि १९९० मध्ये जव्हार (अज), म्हणजे आताच्या डहाणू (अज) मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले) ८८ वर्षीय लहानू कोम यांची भेट घेतली. लहानू कोम हे १९५९ पासून गेली ६६ वर्षे पक्षात आहेत आणि त्यांनी दिग्गज नेते शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांच्यासोबत काम केले आहे. ते अनेक वर्षे पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य होते आणि किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष होते.वृंदा यांनी लहानू कोम यांच्या पत्नी आणि जनवादी महिला संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या हेमलता कोम यांचीही भेट घेतली. हेमलता ताई या पक्षाच्या राज्य कमिटीच्या माजी सदस्या, ठाणे-पालघर जिल्ह्यातील जमसंच्या संस्थापकांपैकी एक आणि तलासरी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. वृंदा करात यांनी पक्षाच्या नेतृत्वाखाली तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरिष्ठ महाविद्यालयालाही भेट दिली. या मंडळाद्वारे तलासरी आणि डहाणू तालुक्यात अनेक शाळा आणि वसतिगृहे, तीन कनिष्ठ महाविद्यालये आणि एक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चालवले जाते. या सर्व संस्थांमध्ये एकूण ८,००० हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.