केदार दिघे यांचा सवाल

ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात काही पत्रके चिटकविण्यात आली होती. या पत्रकांवर आनंद दिघे यांचेसुद्धा छायाचित्र होते. परंतु ही पत्रके फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या फाटलेल्या पत्रकांवरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावलेली होती ती फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचे होते तर माझा फोटो काढायचा होता? निवडणुकीत तुम्हाला दिघे साहेब अडचणीचे ठरू लागले का असा प्रश्न त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून केदार दिघे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक लढवित आहेत. केदार दिघे यांनी त्यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावरून एक ट्वीट प्रसारित केले आहे. त्यामध्ये त्यांचे पत्रक फाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक संदेश देखील त्यामध्ये लिहिला आहे.

‘दिघे साहेबांवरचे प्रेम फक्त चित्रपटापुरतेच का? दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावली आहे. ती प्रतिमा फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचेच होते तर माझा फोटा काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला साहेब अडचणीचे ठरू लागलेत का? मिंधे उत्तर द्या.’ असे त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *