डोंबिवली : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी मद्याच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे. असे अड्डे शोधून आणि प्राप्त तक्रारीप्रमाणे पोलिसांनी येथील मोठागाव, २७ गावांमधील कोळेगाव येथील गावठी, देशी मद्याच्या अड्ड्यावर धाड टाकून मद्य साठा जप्त केला आहे. तसेच तीन मद्य विक्रेत्यांवर मानपाडा, विष्णुनगर पोलीस ठाण्यात कल्याण गुन्हे शाखेचे, स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
निवडणुकीच्या काळात झोपडपट्टी भागातील मतदारांना मद्याचे आमिष काही पक्षीय उमेदवारांच्या समर्थकांकडून दाखविले जाते. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळेतील गस्त वाढविली आहे. ड्रोनव्दारे परिसराची टेहळणी केली जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव टेकडी भागात शिवमंदिराच्या बाजुला झाडाखाली एक व्यक्ति गावठी दारू विकत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना शनिवारी मिळाली. तातडीने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार यु. जी. खंदारे, महाजन घटनास्थळी रवाना झाले. तेथे पिन्टु तुकाराम भोईर हे एका ड्रममध्ये १५ लीटर गावठी (हातभट्टी) लीटर दारू घेऊन विक्रीसाठी बसले होते. विनापरवाना बेकायदा मद्य विक्री केल्याने हवालदार गोरक्ष शेकडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पिन्टु भोईर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.
विष्णुनगर पोलिसांनी मोठागाव मधील शिवमंदिराच्या बाजुला छापा टाकून गणेश संपत सहाने यांच्याजवळील देशी दारूचा साठा जप्त केला. त्यांच्यावर हवालदार श्रीराम मिसाळ यांनी विना परवाना दारू साठा करणे आणि विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने २७ गावातील कोळेगाव मधील हनुमान मंदिराजवळ छापा टाकून २० लीटर गावठी मद्याचा साठा जप्त केला. विनापरवानगी मद्य विक्री केल्याप्रकरणी हवालदार प्रशांत वानखेडे यांनी राजेश ओमप्रकाश गुप्ता यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *