डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण पूर्ण झाले. दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता भारतातील सर्वात मोठी करमणूक कंपनी असण्यासोबतच ‘जिओस्टार’ एक स्पोर्टस पॉवरहाऊसदेखील असेल.
स्पर्धा आयोग आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर रिलायन्सची उपकंपनी ‘व्हायाकॉम-18’ आणि ‘डिस्ने इंडिया’चे विलीनीकरण प्रभावी झाले आहे. या संयुक्त उपक्रमासाठी ‘रिलायन्स’ने 11 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की हा करार पोस्ट मनी आधारावर 70 हजार 352 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीमध्ये ‘रिलायन्स’चा 63.16 टक्के आणि ‘डिस्ने’चा 36.84 टक्के हिस्सा असेल. नीता अंबानी या कंपनीच्या अध्यक्ष असतील. कंपन्यांनी सांगितले की या संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व तीन मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. केविन वाझ मनोरंजन संस्थेचे प्रमुख असतील. किरण मणी डिजिटल संस्थेची जबाबदारी सांभाळतील तर संजोग गुप्ता क्रीडा संघटनेचे नेतृत्व करणार आहेत.
‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, ‘या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत आहे. मी संयुक्त उपक्रमाच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो.’ या मेगा विलीनीकरणामध्ये ‘डिस्ने स्टार’चे 80 आणि ‘रिलायन्स वायकॉम 18’चे 40 चॅनेल जोडले जातील. म्हणजेच एकूण 120 चॅनेल असतील. तथापि, यापैकी काही चॅनेल बंद केले जाऊ शकतात. ‘व्हायाकॉम 18’ कडे ‘बीसीसीआय’ व्यवस्थापित क्रिकेट सामन्यांचे टीव्ही हक्क आहेत तर डिस्ने स्टारकडे 2027 पर्यंत आयपीएल प्रसारित करण्याचे टीव्ही अधिकार आहेत. रिलायन्सकडे जिओ सिनेमावर आयपीएल दाखवण्याचे अधिकार आहेत. रिलायन्सचे न्यूज चॅनेल या डीलचा भाग नसतील.
रिलायन्स ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे बाजारमूल्य 17,15,498.91 कोटी इतके आहे. रिलायन्स सध्या हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, प्रगत साहित्य आणि कंपोझिट, अक्षय ऊर्जा (सौर आणि हायड्रोजन), डिजिटल सेवा आणि किरकोळ क्षेत्रात कार्यरत आहे.