हरिभाऊ लाखे
नाशिक दिंडोरी येथे निवडणूक मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथे निवडणूकविषयक प्रशिक्षणासह कामास नऊ शिक्षक गैरहजर राहिले. याबाबत दिंडोरीचे तहसीलदार वसंत धुमसे (५२, रा. नाशिक) यांनी माहिती दिली.
दोन हजार १३० मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे मंगळवारी दिंडोरी येथील महाविद्यालयात तिसरे प्रशिक्षण शिबीर पार पडले. यानंतर त्यांना मतदान साहित्य देत केंद्रांवर पाठविण्यात आले. परंतु, प्रशिक्षण वर्गासह पुढील कामकाजास नऊ अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिले. यामध्ये सुरगाणा येथील बागबारी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे लक्ष्मण आहेर, सुरगाणा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे चंद्रकांत थविल, निफाड येथील के.जी.डी.एम. महाविद्यालयाचे महेंद्र पवार, चेतन कुंदे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे श्यामकुमार बोरसे, खर्डे येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिरामण सूर्यवंशी, चांदोरी येथील क. का. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाचे अमोल खालकर, जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेचे तारिक गणी, अलंगुन येथील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे मोहन चौधरी यांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रियेत या नऊ जणांनी कामकाजात विलंब, अडथळा निर्माण केला. गैरहजेरीविषयी निवडणूक कार्यालयाकडे कुठलाही अर्ज, परवानगी पत्र सादर केलेले नाही. त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.