उल्हासनगर दि.20(सुनिल इंगळे ):- भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालया समोर पप्पू कलानी हे समर्थकासह समोर गेल्याने, दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. आयलानी यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केल्यावर कलानी समर्थकासह मागे फिरल्याने, पुढील अनर्थ टळला. या प्रकारानंतर कुमार आयलानी यांनी राज्य निवडणूक आयोग, पोलीस आयुक्त यांच्याकडे पप्पू कलानी यांच्या विरोधात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

उल्हासनगर भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या टेलिफोन एक्सचेंज येथील आमदार संपर्क कार्यालयात शेकडो महिलांनी एकच गर्दी केल्याची माहिती मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांना मिळाली. त्यांनी आयलानी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवून पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप करून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे तक्रार केली. पोलीस व निवडणूक भरारी पथकानी आयलानी यांच्या संपर्क कार्यालय ठिकाणी येऊन झाडाझडती घेतली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याने, कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात बंद केले.
याप्रकाराची माहिती पप्पू कलानी यांना मिळाल्यावर त्यांनीही आयलानी यांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. कलानी हे समर्थकासह दिसताच जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याला विरोध म्हणून कलानी समर्थकांनीही घोषणानाजी केल्याने, वातावरण तणावपूर्ण झाले. अखेर कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांच्या सोबत वाद घालणाऱ्या महिलेला कार्यालयात नेऊन, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

कुमार आयलानी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यावर, पप्पू कलानी हेही समर्थकासह मागे फिरले. वेळीच आयलानी यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने व कलानी मागे फिरल्याने, पुढील अनर्थ टळला आहे. कलानी व आयलानी ऐन निवडणुकी दरम्यान आमने-सामने आल्याने, मोठा राडा होण्याची शक्यता होती. दरम्यान कलानी यांच्या एका पक्षीय पदाधिकाऱ्याचे गोलमैदान येथील कार्यालय भाजप पदाधिकाऱ्यांनी बंद पडल्याने, कलानी व आयलानी यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस याबाबत काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे. लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *