ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची जागाही बळकावली

ठाणे :शास्त्रीनगर  नंबर १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. तशी वर्कऑर्डरही निघाली आहे. या संदर्भात उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करुनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासिंयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मा. नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे.

शास्त्रीनगर  हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूल कडून शास्त्रीनगर  नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरु करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकाविल्या आहेत. आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या कडे तक्रारी करुनही अद्याप कारवाई केलेली नाही. माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *