पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे कचऱ्याचे आगार बनले आहे. कार्यालयाच्या आवारात निवडणूक काळात जप्त केलेले बेकायदा साहित्य टाकले आहे. या साहित्याचा ढीगच येथे तयार झाला आहे. हा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे येथील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
विधानसभा निवडणूक काळात विधानसभा क्षेत्रात लावलेले बॅनर्स, झेंडे, पोस्टरवर पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. हे जप्त केलेले साहित्य पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात आणून टाकले आहे. यामुळे या ठिकाणी या साहित्याच्या कचऱ्याचा ढीग तयार झाला आहे. विभागीय कार्यालयाची वास्तू जीर्ण व धोकादायक झाल्याने येथून कार्यालय इतरत्र हलवण्यात आले आहे. यामुळे या वास्तूकडे प्रशासन आता फारसे लक्ष देत नाही, परंतु या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र, मालमत्ता कर भरणा विभाग सुरू आहे. त्यामुळे येथे नागरिकांची दररोज वर्दळ सुरू असते. काही नागरिक पालिका आवारात वाहने उभी करतात. सुरक्षा रक्षक, होमगार्ड यांचे कार्यालय येथे आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करत प्रशासन केवळ जप्त केलेल्या साहित्याचा कचरा या कार्यालयाच्या आवारात आणून टाकत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी अडथळा निर्माण होत आहे.
पालिका प्रशासन कारवाई करत साहित्य जमा करत आहे; मात्र त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने पालिकेच्या आवारातच अस्वच्छता पसरली आहे. निवडणूक कामात पालिका अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने याकडे त्यांचे लक्ष जात नसल्याचे म्हटले जात आहे; मात्र निवडणूक काळातच कारवाई करत जप्त केलेल्या साहित्याची विल्हेवाट कधी लावली जाणार? पालिका प्रशासन याकडे गांर्भीयाने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.