मतदारराजाचा वाढीव कौल कुणाच्या पथ्यावर : विजयाचे गणित बदलले. धाकधूक वाढली
ठाणे, : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शांत झाला आणि मतदानाचा उत्सवही शांततेत पार पडला. त्यामुळे आता शनिवारी लागणाऱ्या निकालाची ओढ लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघात यंदा अंदाजे सहा टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे मतदारराजाचा हा वाढीव कौल कुणाच्या पथ्यावर पडणार, कोण घरी बसणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक जण आपआपला अंदाज बांधत आहे. अनेक विधानसभा मतदारसंघाचे गणित एका रात्रीत बदलले आहे. काही मोजके मतदारसंघ सोडले, तर बहुतेक ठिकाणी अटीतटीचा सामना आहे. त्यामुळे आजी, माजी आणि भावी आमदार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवाराचे भवितव्यही टांगणीला लागले आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सुमारे २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी चार ते पाच उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली, पण एकंदरीत झालेली बंडाळी आणि अपक्ष उमेदवारांमुळे डोकेदुखी अखेरपर्यंत कायम होती. याचा परिणाम मतदानावरही झालेला पाहायला मिळाला आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंध असलेली शिवसेना, भाजप युती आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी तुटली होती. त्यामुळे हे चारही प्रमुख पक्षासह मनसे आणि छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले. परिणामी मतदानाचा टक्का हा ५० टक्क्यांपेक्षा पुढे होता, पण २०१९ मध्ये पुन्हा युती- आघाडी झाल्याने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली. तेव्हा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होते, पण २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती आणि शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी, अशी थेट लढत आहे. यात मनसेचे इंजिनही धावले. प्रत्येक पक्षात बंडखोरी झाली. ही बंडखोरी रोखण्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे अपक्षांची संख्याही कमालीची वाढली.
सहा मतदारसंघांत १७ पेक्षा जास्त उमेदवार मैदानात होते. उर्वरित मतदारसंघामध्येही उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. त्यातुलनेत यंदा मतदानाचा टक्काही वाढणार हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मतदानात सहा टक्क्यांची अंदाजित वाढ झाली आहे. हा टक्का आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे असले तरी सध्या हातात असलेल्या टक्केवारीवरून अंदाजाचे पूल बांधले जात आहेत. या निवडणुकीत सुमारे १७ आजी आमदार पुन्हा रिंगणात होते. त्यांना तितक्याच ताकदीची टक्कर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी यंदा दिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मतदानाआधी झालेल्या प्रचारावरून विजयाचे काही अंदाज बांधण्यात आले, पण मतदानाआधी झालेल्या घडामोडीमुळे अनेक मतदारसंघाचे गणित पुन्हा विस्कळित झाले आहे. त्यामुळे नेमका कुणाला फटका बसणार आणि कोण विजयी ठरणार याचे चित्र अस्पष्ट आहे.
धोक्याची घंटा
ठाण्यात महायुतीचे सर्वाधिक १४ आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे दोन विद्यमान आमदार आहेत. अपक्ष एक आणि मनसेचा एक असे एकूण जिल्ह्याचे बलाबल आहे, पण या निवडणुकीतही महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील यात शंका नाही, पण काही जागांवर नुकसान सहन करावे लागणार असल्याचा अंदाज आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या खात्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: नवी मुंबई आणि कल्याण, भिवंडीच्या ग्रामीण भागात धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ठाणे, एरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, मीरा- भाईंदर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, शहापूर, उल्हासनगर आदी मतदारसंघातील विद्यमान आमदारांभोवती धोक्याची घंटा घोंगावत असल्याचे दिसते. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवाडा, कळवा-मुंब्रा, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लढतीमध्ये काही अपक्षही निवडणून येण्याची शक्यता आहे, पण हा केवळ ग्राऊंड रिपोर्टचा अंदाज आहे. खरी परिस्थिती २३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. वास्तविक मतदानाआधी बांधलेले अंदाज आणि मतदानानंतरची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. अखेरच्या क्षणापर्यंत एक एक मत मिळवण्यासाठी संबंधित पक्षाचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते झटत होते, पण शांत आणि संयमी मतदारांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परिणामी यंदा मोठ्या मताधिक्यांऐवजी अटीतटीचा सामनाच अधिक रंगलेला आहे.
ठाण्यात खलबते
ठाणे शहराचे हृदय असलेल ठाणे विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव अशी तिहेरी लढत येथे आहे. २०१९ च्या निवडणुकीत अविनाश जाधव यांनी ७२ हजारांहून अधिक मते मिळवली होती; मात्र त्या वेळी शिवसेना भाजप युती होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांची शिदोरी जाधव यांना मिळाली होती. त्यात शिवसेनेचा एक गटही सक्रिय होता, असे म्हटले जाते, पण या वेळी परिस्थिती बदलली आहे. मनसे पूर्णपणे एकटी पडल्याचे दिसते. शिवसेनेच्या मतांचे विभाजनही येथे होणार आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे राजन विचारे हे तगडे आव्हान आहे. त्यामुळे विद्यमान आमदार डेंजर झोनमध्ये आले होते. अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुरा सांभाळी होती. पण या मतदारसंघात यंदा ५९.८५ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत सुमारे सात टक्के मतदान वाढले आहे. हे वाढीव मतदान केळकर यांना तारणार का हे पहावे लागणार आहे.
कोपरी-पाचपाखाडी मताधिक्य मिळणार?
कोपरी पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या विधानसभा मतदान क्षेत्रासह मुख्यमंत्री पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे यांचे आव्हान आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे हेसुद्ध मैदानात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांवर त्याचा परिणाम होणार अल्याचे दिसते. २०१९ मध्ये या मतदारसंघात ४९.०२ इतके मतदान झाले होते. या वेळी तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन चेहरा असलेले केदार दिघे येथून बऱ्यापैकी मते आपल्या ओंजळीत घेतील, पण मुख्यमंत्री मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे दिसते.
ओवळा-माजिवाडा चौकाराची संधी?
ओवळा माजिवाडा मतदारसंघाचीही हीच स्थिती आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार नरेश मणेरा आणि मनसेचे संदीप पाचंगे अशी तिहेरी लढत आहे. उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय वस्तीच्या गर्दीत येथे झोपडपट्टी परिसरही विस्तारला आहे. त्यातही उत्तर भारतीय मतदारांचा टक्का बऱ्यापैकी आहे. या मतदारसंघात सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला, पण तरीही अपुऱ्या पाणीटंचाईमुळे त्यांना किंचित तोटा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी विजयाचा चौकार ते साधणार असल्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये येथे ४३.०८ इतके मतदान झाले होते. यंदा त्यात नऊ टक्क्यांची वाढ होऊन ५२.८१ टक्के मतदान झाले आहे.
कळवा-मुंब्र्यात रंजक सामना
कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या वेळी त्यांच्यासमोर एकेकाळी त्यांचा शिष्य म्हणून ओळखले जाणारे नजिब मुल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटातून टक्कर देत आहेत. मनसेचा उमेदवारही येथे आहे, पण थेट लढत गुरु-शिष्यातच होणार आहे. आव्हाड यांचा हा मतदारसंघ गड मानला जातो. या गडाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभा येथे झाल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ही विधानसभा येत असल्याने मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही येथे जोर लावला, मात्र तरीही येथे मतांची टक्केवारी फारशी वाढली नसल्याचे दिसते. २०१९ मध्ये येथे ५०.०८ टक्के इतके मतदान झाले होते, तर या वेळी ५२.०१ इतके मतदान झाले आहे. एकंदरीत येथे आव्हाड यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
