ठाणे : सर्व वयोगटातील नागरिक तंदुरुस्त राहण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे रोटरी दिव्यांग सेंटर आणि क्लबच्या माध्यमातून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी सरासरी दोन हजारांहून अधिक धावपटू सहभागी होतात. चालवल्या जाणाऱ्या इतर समाजाभिमुख सेवा प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी कल्याणमध्ये यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षी रविवारी (ता. २४) पूर्ण मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे. ही मॅरेथॉन ठाणे डिस्ट्रिक्ट ॲथलेट असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स प्रमाणित आहे. रोटरी स्पोर्टस सर्कल गांधारी ब्रीजजवळ, नवीन रिंग रोड, कल्याण पश्चिम येथून या मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर पिण्याचे पाणी, एनर्जी बुस्टर्स यांची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बिब, टी शर्ट, मेडल, नाष्टा, कुपन्स देण्यात येणार आहेत. विजेत्यांना पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.