मुंबई : काही दिवसांपूर्वी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्यांचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मुंबईमध्ये आतापर्यंत रेबीजची लागण होऊन दोन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाने बीएआरसी, तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारपासून ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ला सुरुवात केली.

बीएआरसी परिसरात काही दिवसांपूर्वी जखमी कोल्हा आढळला होता. या कोल्ह्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोल्ह्याच्या हालचालींमधील फरक लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याची रेबीज चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल प्राप्त होताच सदर कोल्ह्याला रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी चेंबूर परिसरातही जखमी कोल्हा आढळला होता. त्यालादेखील रेबीज झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, मुंबईत लागोपाठ दोन कोल्ह्यांचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, तसेच सर्वेक्षण करण्यासाठी संशोधन केंद्राची परवानगी मागितली होती. संशोधन केंद्राने परवानगी वनविभागाला संशोधन करण्याची परवानगी दिली असून मगंळवारपासून या भागात कॅमेरा ट्रॅपिंग सुरू करण्यात आले. याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या परिसरातही ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला वनविभागाने पत्र पाठवले आहे. मात्र त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही.

‘कॅमेरा ट्रॅप’च्या माध्यमातून परिसरातील कोल्ह्यांची संख्या , भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या हद्दीत कोल्ह्यांचे अस्तित्व असल्याचा शास्त्रीय पुरावा वनविभागाला मिळण्यास मदत होईल, असे उप वनसंरक्षक, ठाणे वनविभागाचे अक्षय गजभिये यांनी सांगितले. शिवाय या माहितीमुळे कोल्ह्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सोपो होईल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *