उरण – उरण परिसरात नोव्हेंबर महिन्यात पारा घसरू लागल्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे. सध्या तालुक्यात गुलाबी थंडीचे रूपांतर बोचऱ्या थंडीमध्ये झाल्यामुळे उरणकरांना हुडहुडी भरत आहे. सकाळी पडणारे दाट धुके आणि बोचणाऱ्या थंडीमुळे उरणकरांनी उबदार कपडे कपाटातून बाहेर काढले आहेत, शिवाय चौकाचौकात शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून उबदार गरमीचा आनंद घेत असलेले नागरिक हे चित्र सध्या उरण परिसरातील ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
दाट धुके आणि बोचणारी थंडी
तालुक्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत चालला आहे. पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. सकाळी सकाळी पडणारे दाट धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडीबरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपऱ्यांवर ऊब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्याभोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गारवा वाढत चालल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. नागरिकांकडून लाकडे, पालापाचोळा, पेंढा इत्यादींचा वापर करून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग असल्याने लाकूडफाटादेखील मुबलक आहे.
ग्रामीण भागात जास्त प्रमाणात थंडी
हिवाळ्यासाठी खास मोठे लाकूड, ओंडके शेकोटीकरिता ग्रामस्थांकडून राखून ठेवले जात आहेत. त्यामुळे अंगणात, परसदारीत दररोज लाकूडफाटा पेटवून शेकोटी केली जात आहे. अबालवृद्धांसह सर्व जण या शेकोट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. सकाळी साधारणता साडेसात, आठ वाजेपर्यंत अगदी सूर्याची किरणे जाणवेपर्यंत शेकोटीचा आनंद घेतला जातो, तसेच रात्रीही जेवणानंतर अनेक ठिकाणी शेकोट्याभोवती उबदारपणा घेतला जाऊ लागला आहे. हिवाळा आणि शेकोटीचा हा कार्यक्रम सर्वांच्या जीवनातील आनंदाचा भाग असून गाणी, गप्पा, विनोद आणि मनोरंजनाची वेगळी अशी पर्वणी या निमित्ताने सर्वांना मिळते आहे. त्याचप्रमाणे उरण शहरात सार्वजनिक ठिकाणी, चौकात आवर्जून युवकांकडून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. काही जण या शेकोटीमध्ये मका, रताळी भाजणे, असा प्रकार करून त्याचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. पूर्वी आंब्याच्या आतील बाठा सूकवून त्यातील कोय (आंब्याची बी)देखील भाजली जात होती, एरवी जिभेला कडू लागलेला आंब्यातील कोय भाजल्यावर त्याची गोड तुरट अशी चव लागते. त्यामुळे आजही काही जण याचा वापर शेकोटी पेटवताना करत आहेत, मात्र त्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. काही जण पोपटी, तंदुरी पार्ट्यादेखील करू लागले आहेत.
कोट
तालुक्यात वातावरणाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे रात्री प्रचंड थंडी पडत आहे. आम्ही मित्रमंडळी आणि गावातले सर्वच नागरिक शेकोट्या करून थंडीचा आनंद लुटत आहोत.
-सुशांत म्हात्रे, रहिवासी