पनवेल – विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीचा मुहूर्त साधत सिडको महामंडळाने नवी मुंबई पोलीसांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील पारगाव येथील टेकडीवर सिडको महामंडळाकडून विना परवानगी घेता बांधलेले बांधकाम गुरुवारी पहाटेपासून जमिनदोस्त करण्याची कारवाई सूरु केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील हालचाली या टेकडीवरुन सहजरित्या पाहू शकतील, यामुळे अनेकांनी संबंधित वादग्रस्त बांधकामावर कारवाईची मागणी केली होती.
पनवेल तालुक्यातील पनवेल – जेएनपीटी महामार्गालगतच्या पारगाव गावातील उंच टेकडीवर सर्वे क्रमांक ९० या जमिन क्षेत्रावर सूरुवातीला बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत धार्मिकस्थळ बांधण्यात आले होते. त्यानंतर हळुहळु या धार्मिकस्थळाच्या बांधकामाचा विस्तार करण्यात आला. याठिकाणी येजा करण्यासाठी खुला असलेला रस्ता बंद करण्यात आल्याने या परिसरात गिर्यारोहन करणा-यांनी संशय व्यक्त केला होता. टेकडीवरील वादग्रस्त बांधकामाकडे सिडको मंडळ कारवाईसाठी कानाडोळा करत असल्याचे ध्यानात आल्यावर टेकडीखाली सुद्धा धार्मिक स्थळाचे निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रसारमाध्यमांनी याविषयी ठळक वृत्त झळकविल्यामुळे सिडकोचा ढिम्म कारभाराविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. स्थानिक गावक-यांनी केलेली बांधकामे जमीनदोस्त करणा-या सिडको मंडळ धार्मिक स्थळांना का अभय देत आहे अशीच चर्चा ग्रामस्थांमध्ये सूरु होती.
पोलीस बंदोबस्ताचे नियोजन
अखेर सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हे अतिक्रमन तोडण्याची सूचना सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिली होती. सिडकोचे दक्षता अधिकारी सूरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी विधानसभेच्या निवडणूकीचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी रात्रीतच अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. गुरुवारी पहाटेपासून पोलीस बंदोबस्त या परिसरात उभा कऱण्यात आला. राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदान संपल्याने उसंत घेण्यासाठी विसावले असताना ही कारवाई करण्यात आली. सिडकोने बांधकाम निष्काषित करण्यासाठी लागणारे बुलडोझर आणि जेसीबी, मजूर असे साहीत्याची बुधवारीच नियोजन केले होते. पहाटे ७ वाजून ६ मिनिटांनी कारवाईला सूरुवात झाली. साडेनऊ ते साडेदहा वाजेपर्यंत कारवाई सूरु होती. धार्मिकस्थळ जमिनदोस्त करत असल्याचे वृत्त काही मिनिटांत वा-यासारखे पसरल्यानंतर या परिसरात नागरीक जमू लागले. पोलीसांनी टेकडीवरती जाण्यास नागरिकांना नकार दिल्याने पुढील संघर्ष टळला.