नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची कळवण आगाराची बस गुरूवारी कळवण-नाशिक मार्गावर धावत असताना वाहक सुनीता पवार यांना बसमधील महिला प्रवाशाचे पाकिट चोरीस गेल्याचे कळले. त्यांनी सतर्कता बाळगत बस पोलीस ठाण्यात नेत चोरांना पकडून दिले. त्यांच्या या सतर्कतेचा सन्मान महामंडळाच्या वतीने करण्यात आला.

कळवण-नाशिक बसमधून दोन महिला लहान मुलांसह प्रवास करत होत्या. बसमध्ये ७० ते ८० प्रवासी होते. वाहक सुनीता पवार यांना सदर महिला संशयास्पद हालचाल करत असल्याचे जाणवले. संबंधित महिला दिंडोरी स्थानकात उतरल्या. वाहक पवार यांनी पाठीमागून नाशिक मार्गावर धावणाऱ्या कळवण आगाराच्या बसवरील वाहक वैशाली सहारेयांना दिंडोरी स्थानकात दोन संशयित महिला लहान मुलांसह असल्याचे कळविले. त्या बसमध्ये बसल्यास नजर ठेवण्याची सूचना केली.

दिंडोरी बस स्थानकात संशयित महिला आणि त्यांच्या बरोबर असलेली लहान मुले वाहक सहारे यांच्या बसमध्ये बसल्या. बस सुरु झाल्यानंतर एका महिला प्रवाशाने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केली. वाहक सहारे यांनी पवार यांना बसमध्ये चोरी झाल्याचे कळविले असता पवार यांनी बस पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सुचविले. त्यानुसार वाहक सहारे या बस म्हसरूळ पोलीस ठाण्यात घेऊन गेल्या. पोलिसांनी गाडीतील प्रवाशांची तपासणी केली असता संशयित महिलांकडे चोरी झालेले पाकीट आढळून आले. पवार आणि सहारे या कळवण आगाराच्या दोन्ही महिला वाहकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाचे चोरी झालेले पाकीट परत मिळाले. दोन महिला चोर पोलिसांना सापडले. दोन्ही महिला वाहकांनी आपल्या कामात दाखविलेल्या तत्परतेबद्दल नाशिक विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी पवार यांचा सत्कार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *