समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंग यादव यांची आज जयंती. मुलायमसिंग यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील सैफई या गावात झाला. मुलायम सिंग यांनी आग्रा विद्यापीठातून एम. ए व जैन इंटर कॉलेज करहल मधून बीटी केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच त्यांनी राजकीय राजकीय चळवळीत भाग घेतला. १९५४ साली वयाच्या पंधराव्या वर्षी समाजवादी नेते डॉ राम मोहन लोहिया यांच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. जेष्ठ समाजवादी नेते डॉ राम मनोहर लोहिया यांना ते गुरू मानत. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच त्यांनी समाजवादी आंदोलनात भाग घेतला. १९६७ साली मुलायमसिंग यादव युनायटेड सोशालिस्ट पक्षाच्या तिकिटावर प्रथमच विधानसभेत निवडून गेले. १९७५ साली जेंव्हा देशात आणीबाणी घोषित झाली तेंव्हा या आणीबाणीला मुलायमसिंग यादव यांनी कडवा विरोध केला. आणीबाणीच्या काळात मुलायमसिंग यादव यांना १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणी उठल्यानंतर काँग्रेसला विरोध करण्यासाठी जो जनता परिवार तयार झाला होता त्यात मुलायमसिंग यांची भूमिका खूप महत्वाची होती. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, बिजू पटनाईक, चंद्रशेखर हे जनता परिवारातील त्यावेळचे तरुण तुर्क नेते होते. या नेत्यांनी मिळून पुढे जनता दल या पक्षाची स्थापना केली. १९८९ साली हा पक्ष केंद्रात सत्तेवर आला मात्र कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच हे सरकार पडले. पुढे जनता दलात फूट पडली. मुलायमसिंग यादव हे ही जनता परिवारातून बाहेर पडले आणि ४ नोव्हेंबर १९९२ रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९९६ साली जेंव्हा केंद्रात तिसऱ्या आघाडीची सत्ता आली तेंव्हा मुलायमसिंग यादव हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होते मात्र काही कारणांनी त्यांना पंतप्रधान होता आले नाही. एच डी देवेगौडा हे भारताचे पंतप्रधान बनले. एच फी देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री बनले. पण हे सरकारही जास्त काळ टिकले नाही त्यानंतर आय. के. गुजराल पंतप्रधान बनले त्यांच्या मंत्रिमंडळात देखील ते मंत्री बनले. याकाळात त्यांनी भाजपला प्रखर विरोध केला. त्यामुळे ते काँग्रेसच्या जवळ गेले असे मानले जात होते मात्र १९९९ साली जेंव्हा काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तेंव्हा मुलायमसिंग यादव यांनी त्यांना साथ दिली नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी उत्तरप्रदेश मधील आपला वरचष्मा कायम ठेवला. उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या राज्याचे ते ५ डिसेंबर १९८९ ते २४ जानेवारी १९९१, ५ डिसेंबर१९९३ ते ३ जून १९९६ आणि २९ ऑगस्ट २००३ ते ११ मे २००७ या कालावधीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. पुढे त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव हे देखील उत्तर प्रदेशचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले. उत्तर प्रदेशच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात कायम मध्यवर्ती भूमिका बजावणारे मुलायमसिंग हे दिलदार राजकारणी म्हणून ओळखले जात. १० ऑक्टोबर २०२२ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीची मोठी हानी झाली. मुलायमसिंग यादव यांनी आयुष्यभर समाजवादी विचारांची धुरा वाहिली. समाजवादी विचारांचे पाईक असलेल्या मुलायमसिंग यादव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५