अशोक गायकवाड

रत्नागिरी : रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती माध्यम कक्षाला ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट देऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. उमेदवारांच्या वर्तमानपत्रातील तसेच इलेक्ट्रॉनिक आणि विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवा, अशी सूचना सिंह यांनी केली.

यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन उपस्थित होत्या. जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते यांनी कामकाजाबाबत माहिती दिली. वर्तमानपत्रातील जाहिराती-बातम्या, स्थानिक वाहिन्यांसह विविध वाहिन्यांवरील बातम्यांच्या नोंदी, जाहिरातींच्या नोंदी ठेवण्यात येत असतात. त्याबाबतचा अहवाल निवडणूक खर्च निरीक्षकांकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, समाजमाध्यमांवरीलही जाहिरातींवर लक्ष ठेवावे. विशेषत: प्रसारित होणाऱ्या बातम्या, पोस्ट या पेड न्यूज आहेत का ? याबाबत लक्ष ठेवून, त्या समितीच्या निदर्शनास आणाव्यात. उमेदवारांच्या इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणिकरण केले आहे का, यावरही बारकाईने लक्ष ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *