महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष बाहेर आले आहेत. दहा मतदानोत्तर चाचण्यांपैकी सहा मतदानोत्तर चाचण्यात महायुतीला तर चार मतदानोत्तर चाचण्यांत महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी आहे, असे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांची चर्चा होत राहील. मतचाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांत फरक असतो. अनेक प्रगत देशात शास्त्रीय चौकटी वापरूनही मतचाचण्यांचे निष्कर्ष चुकतात. भारतात तर मतचाचण्यांवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. जात, धर्म, घराणे आदींचा विचार मतदान करताना केला जात असतो. त्यातही भारतीय मतदार फारसा व्यक्त होत नाही. तो कुणाला मतदान केले हे सांगत नसतो किंवा मतदान एकाला आणि प्रत्यक्ष सांगताना दुसऱ्याच पक्षाचे नाव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष कधीच प्रत्यक्षात येत नाही. एखाद्या संस्थेचा निष्कर्ष एका वेळी बरोबर ठरत असला, तरी तो दुसऱ्या वेळी तो चुकीचा ठरतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दहा वेगवेगळ्या संस्थांपैकी एकाच संस्थेचा निष्कर्ष निकालाच्या जवळपास जाणारा होता. हरियाणात बहुतांश चाचण्यांनी काँग्रेसच्या हातात सत्ता जाईल, असे म्हटले होते; परंतु प्रत्यक्षात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीरमध्ये छोट्या पक्षांना जास्त महत्त्व येईल, असे सांगितले जात होते. ‘नॅशनल कॉन्फरन्स’ला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे कोणत्याही संस्थेच्या निष्कर्षात म्हटले नव्हते. तसेच काँग्रेस सत्तेच्या बाहेर राहील, असे कुणालाच वाटले नव्हते. निवडणूक आणि राजकारण हा अनिश्चततेचा खेळ आहे, हे खरे आहे आणि भारतीय जनमनाचा अंदाज कुणालाही अचूक वर्तवता येत नाही, हे त्यातील वस्तुस्थिती आहे. मतचाचण्या करणाऱ्या संस्था कितीही व्यावसायिकपणा आणीत असल्याचा दावा करीत असल्या, तरी जनता त्यांना खोटे पाडत असते. मतदान झाल्यावर मोजक्या लोकांशी बोलून लाखो लोकांच्या मनाचा अंदाज वर्तवणे जोखमीचे असते, याचा प्रत्यय वारंवार आला आहे. झारखंड विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या, तर महाराष्ट्राच्या निवडणुका २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात झाल्या. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत संपूर्ण निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये निकराची लढत झाली. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणतीही कसर सोडली नाही. दोन्ही राज्यांतील ‘एक्झिट पोल’चे निकाल धक्कादायक आहेत.
मतदानोत्तर चाचण्या कोणती संस्था घेते, ती कुणाला अनुकूल असते, तिची विचारधारा कोणती असते, कोणत्या पक्षाने तिला पैसे दिले आहेत, यावर मतचाचण्यांचे निष्कर्ष अवलंबून असतात.
या निवडणुकीत महाआघाडीचा भाग असलेला भाजप १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत होती. महाविकास आघाडीत काँग्रेसने १०१, शिवसेनेने ९५ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ८६ उमेदवार उभे केले. याशिवाय बहुजन समाज पक्षाने २३७ उमेदवार उभे केले होते. ‘एमआयएम’ने १७ उमेदवार उभे केले होते. ‘मनसे’ने सव्वाशेपेक्षा अधिक जागा लढवल्या. तिसरी आघाडी आणि वंचित आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात होती;परंतु विविध मतचाचण्यांच्या अहवालात त्यांना फार जागा मिळणार नाहीत; परंतु महायुती आणि महाविकास आघाडीच्या चुरशीच्या लढतीत या छोट्या छोट्या पक्षांना किंवा अपक्षांना महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जाण्याची शक्यता दिसते. ‘मॅट्रिझ’च्या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजप आघाडीला १५० ते १७० जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेस पक्षाला ११० ते १३० जागा मिळू शकतात. इतरांना ८ ते १० जागा मिळू शकतात. ‘मॅट्रिझ’च्या ‘एक्झिट पोल’नुसार, भाजपला ४२ ते ४७ जागा मिळू शकतात, तर काँग्रेस आघाडीला २५ ते ३० जागा मिळू शकतात. ‘चाणक्य स्ट्रॅटेजी’ने घेतलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार, भाजप आघाडीला १५२ ते १६० जागा मिळू शकतात, काँग्रेस आघाडीला १३० ते १३८ जागा मिळू शकतात तर इतरांना ६ ते ८ जागा मिळू शकतात. म्हणजेच ‘चाणक्य स्ट्रॅटेजी’ही महायुती आघाडी सरकारवर आपल्या मान्यतेचा शिक्का मारत आहे. म्हणजे भाजपला ४७ टक्के, काँग्रेस आघाडीला ४२ टक्के आणि इतरांना ११ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांना, भाजपला ९० जागा, शिवसेनेला ४८ जागा, राष्ट्रवादीला २२ जागा आणि इतरांना २ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडी आघाडीत समाविष्ट काँग्रेसला ६३ जागा, शिवसेनेच्या ठाकरे गटाला ३५ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा मिळू शकतात. ‘चाणक्य’च्या मते झारखंडमध्येही ‘एनडीए’चे सरकार बनू शकते. ‘चाणक्य’च्या मते, भाजपला ४५ ते ५० जागा, काँग्रेसला ३५ ते ३८ जागा आणि इतरांना ३ ते ५ जागा मिळू शकतात. ‘पीएमएआरक्यू’ च्या ‘एक्झिट पोल’नुसार महाराष्ट्रात भाजपला १३७ ते १५७ जागा, काँग्रेसला १२६ ते १४६ आणि इतरांना २ ते ८ जागा मिळू शकतात, तर ‘पोल डायरी’ च्या ‘एक्झिट पोल’नुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १२२ ते १८६ जागा, काँग्रेसला ६९ ते १२१ जागा आणि इतरांना १२ ते २९ जागा मिळू शकतात.
झारखंडमध्ये या वेळी घुसखोर आणि आदिवासींचा मुद्दा उचलून धरण्यात भाजप यशस्वी झाला. संथाल परगणासारख्या भागात आदिवासींची भौगोलिक स्थिती बदलली. याचा पुरेपूर फायदा भाजपला झाला. यापूर्वी हरियाणा किंवा छत्तीसगडमध्ये ‘एक्झिट पोल’चे दावे खरे ठरले नव्हते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटका झाली नाही. १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली, तेव्हा आदिवासी समाजाचे उत्थान हे त्याचे एकमेव उद्दिष्ट होते. असे असूनही तेथील आदिवासींच्या समस्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही. आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांपैकी रघुवर दास हा एकच बिगर आदिवासी मुख्यमंत्री होऊ शकला असला, तरी पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला; पण या वेळी भाजपने झारखंडमध्ये एकही चेहरा पुढे केला नाही. येथे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची बोट एकट्या सोरेन यांच्यावर अवलंबून होती. महाविकास आघाडीमध्ये जागांच्या बाबतीत समन्वयाचा अभाव होता. यापूर्वी, २०१९ मध्ये ‘एक्झिट पोल’ घेण्यात आले होते. एक किंवा दोन एजन्सी वगळता, त्यापैकी बहुतेकांनी भाजप-शिवसेना सरकार स्थापनेच्या बाजूने भाकीत केले होते; मात्र निकाल हाती आल्यावर ‘एक्झिट पोल’चा सरकार स्थापनेचा दावा बरोबर असला तरी जागांचे अंदाज पूर्णपणे चुकीचे निघाले. त्या वेळी महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘ॲक्सिस माय इंडिया’ने भाजप-शिवसेनेला १६६ ते १९४ जागांचा अंदाज व्यक्त केला होता, तर काँग्रेस आघाडीला ८६ जागा मिळतील, असे म्हटले होते. ‘सी व्होटर’च्या वतीने भाजप-शिवसेना युतीला १८२ ते २०६ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ७२ ते ९८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हा भाजप-शिवसेना युतीला १६१ जागा मिळाल्या, तर ९८ जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला गेल्या. भाजपला १०५ तर अविभाजित शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘एनडीए’ला अनेकांनी ४०० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात निकाल वेगळाच होता. ‘एनडीए’ने सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला असला, तरी ‘एक्झिट पोल’च्या अंदाजापेक्षा निकाल बराच वेगळा होता. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपला या वेळी केवळ २४० जागा मिळाल्या, स्वबळावर साधे बहुमत मिळवण्यात अपयश आले. दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीने २३४ जागा जिंकत अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. ‘एनडीए’ला २९३ जागां मिळाल्या. हे भ्रामक अंदाज राजकीय क्षेत्राच्या पलीकडे फिरले, आर्थिक बाजारपेठांमध्ये गोंधळ उडाला. हरियाणा ‘एक्झिट पोल’च्या विश्वासार्हतेला आणखी एक धक्का बसला. जवळपास सर्व प्रमुख ‘पोलस्टर्स’नी ९० जागांच्या विधानसभेत ५० ते ६२ जागांच्या अंदाजानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजांमुळे उत्साही, काँग्रेस हरियाणा मुख्यालयाने उत्सवाची तयारी केली, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिलेबी आणि लाडूंचे वाटप केले. कारण सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पक्ष आघाडीवर होता; मात्र जसजशी मतमोजणी सुरू होती, तसतशी भाजपने नाट्यमय पुनरागमन करत ४८ जागा जिंकून सत्ता राखली. चुकीच्या आशावादाचा फटका काँग्रेसला बसला होता. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ‘मोठ्या विकृती’ निर्माण केल्याबद्दल ‘एक्झिट पोल’वर तीव्र टीका केली. ‘एक्झिट पोल’ नुसार महाराष्ट्रात ‘काँटे की टक्कर’ असल्याचे दिसत आहे. यात मनसेप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला २-३ जागा मिळणार असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना महत्व प्राप्त होणार आहे. जर त्रिशंकू विधानसभा येणार असेल तर अशा वेळी छोटे पक्ष आणि अपक्षांचे भाव वधारणार आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेने नेमका काय कौल दिला आहे हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.