मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय झाला आहे. अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा भुसे यांनी १ लाख ६ हजार ६०६ मतांनी पराभव केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
यापूर्वी सलग चार वेळा विजयी झालेले दादा भुसे हे पाचव्यांदा निवडणूक लढत होते. अपक्ष बंडूकाका बच्छाव व शिंदे गटाचे अद्वय हिरे यांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल आणि नेमके कोण बाजी मारेल,याचा अजिबात अंदाज येत नव्हता. मात्र भुसे यांना मिळालेले अभूतपूर्व यश बघता ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली, असेच म्हणावे लागेल. एकूण २ लाख ५९ हजार ४९ मतांपैकी भुसे यांना तब्बल ६१ टक्के म्हणजे १ लाख ५८ हजार २८४ मते पडली. प्रतिस्पर्धी बच्छाव यांना ५१ हजार ६७८ तर हिरे यांना ३९ हजार ८४३ मते पडली. एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या प्रत्येक फेरीत भुसे यांना मताधिक्य प्राप्त होत गेले. प्रत्येक फेरीत भुसे यांच्या मताधिक्यात वाढ होत असल्याचे बघून निकाल काय लागेल याचे चित्र स्पष्ट झाल्याने बच्छाव व हिरे यांच्या उपस्थित प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
ठाकरे गटाची अनामत जप्त..
मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. त्यातील १५ जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अनामत जप्त झालेल्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचा समावेश आहे. अनामत रक्कम वाचविण्यासाठी उमेदवारांना किमान ४३ हजार मतांची आवश्यकता होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बंडूकाका बच्छाव यांना ५१ हजार ६७८ मते पडली. अद्वय हिरे यांना केवळ ३९ हजार ८४३ मते पडल्याने त्यांना अनामत रक्कम वाचवता आली नाही. अनामत जप्त झालेल्या अन्य १३ उमेदवारांपैकी आठ जणांना ५०० मतांचाही टप्पा गाठता आला नाही. पाच जणांना ५०० ते १३०० च्या दरम्यान मते पडली. नोटाला १५३९ मते पडली. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. मतमोजणीच्या निमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
या विजयानंतर शिंदे गटाने फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भुसे यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *