चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी
मुंबई: मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तुकाराम काते विजयी झाले आणि त्यांना आव्हान देणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली. तुकाराम काते यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्येकर्त्यांनी चेंबूर परिसरात मोठा जल्लोष केला.
विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर विजयी झाले होते. यावेळी पक्षाने त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिले. त्यांच्यासमोर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली. यापूर्वी तुकाराम काते अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.
चेंबूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र भाजपचे बळ मिळाल्यामुळे तुकाराम काते यांना मोठी मदत झाली. मतमोजणी दरम्यान काते आणि फातर्पेकर यांच्यात मोठी चुरस सुरू होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये तुकाराम काते पिछाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर काते यांनी आघाडी घेत फातर्पेकर यांना मागे टाकले. अखेर २१ व्या फेरीअंती काते यांचा १० हजार ८२२ मतांनी विजय झाला. काते यांना एकूण ६२ हजार ९९१ मते मिळाली, तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२ हजार १६९ मते मिळाली.
०००००