प्रताप सरनाईक हे १ लाख ९ हजार ११६ मताधिक्यांनी विजयी
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो वॅन, मेट्रो प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय, कोविड-१९ च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मतदारांसमोर विकासकामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे.” आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.