नवी मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक नवनवीन डिझाईन्सच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे.

थंडीची चाहूल लागताच विविधरंगी उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नागरिकांकडून उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे. नवी मुंबईतील बाजारपेठेसह रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या दुकानांमध्ये गरम कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

नेरूळच्या बाजारपेठेमध्ये स्वेटर, जॅकेट, कान टोपी, हातमोजे, पायमोजे, महिलांचे स्वेटर अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळ्याचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची खरेदी केली जात आहे.

लहान मुलांना कार्टुनची भुरळ

तरुणाईला उबदार कपड्यांमध्ये फॅशनचा ट्रेण्डही हवा असल्याने स्वेट शर्ट, विंटर कोट, कॉटन जॅकेट्स, कानपट्टी या प्रकारांना तरुणाईची मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी हुडीज, कार्टूनचे चित्र असलेले, चेन असलेल्या स्वेटरला यंदा जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे.

रंगीबेरंगी स्टोल्सला पसंती

दुचाकी चालवताना किंवा थंडीत चेहऱ्याला कोरडी आणि निस्तेज होण्यापासून बचावासाठी मुली स्टोलचा वापर करतात. सिल्क स्टोल सूट सलवार, जिन्स अशा सर्व वेशभूषांत तरुणींना वेगळाच लूक देतो. बाजारात हे स्टोल १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. ड्रेसला मॅचिंग किंवा आपल्या आवडीच्या रंगाच्या स्टोलचा वापर करून आपल्या ड्रेसची शोभा वाढवण्यासाठी मुलींकडून नवनवीन स्टोल्सच्या खरेदीला पसंती मिळत आहेत.

लोकांना आवडतील व परवडतील असे नवनवीन उबदार व नवीन प्रकारचे स्वेटर आणले आहेत. सध्या लोकांचा कल लोकरीचे स्वेटर व तरुणाईचा नवीन डिझाइनचे स्वेटर खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. लोकांची पसंती पाहूनच त्यानुसार बाजारात उबदार कपडे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गौरव दुबे, स्वेटरविक्रेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *