शेतकरी सगळी शेतीकामे उत्तम प्रकारे करतो. तो उत्तम मशागत करतो. उत्तम खते घालतो. पण बाजार व्यवस्था जमत नसल्याने तो खरा मार खातो. जसे की, यावेळी कांद्याचे भाव 70 रुपयांवर गेले आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेता आता शेतकऱ्यांनी कांद्याबाबत विचार करुन निर्णय घ्यायला हवा. कांद्याची निर्यात खुली झाल्याची बाब त्यांनी विचारात घ्यावी.

यंदा पावसाळ्यात उदंड पाऊस झाला असला तरी अधिकच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसानही झाले. दुसरीकडे निवडणुकांमुळे यंदा घोषणांचाही मोठा पाऊस पडला. मात्र आताच्या रब्बी हंगामाचा विचार करता या दोन्हीतून चांगला परिणाम मिळवण्यासाठी विचार तसेच कृती करणे गरजेचे आहे. खरिपामध्ये बहुतेक पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता रब्बी हंगामातून कसे पैसे मिळतील, अधिकची कमाई कशी करता येईल याचे मार्गही शेतकऱ्यांनी तपासून पहायला हवेत. यंदा थंडी चांगली पडत आहे. म्हणूनच रब्बी पिकांना असणारी ही अनुकूल स्थिती आश्वासक म्हणावी लागेल. यंदा आंब्याला चांगला मोहोर येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गहू, हरभरा, वाटाण्यासारखी थंडी आवश्यक असणारी पिकेही खूप चांगली येतील. विचार करायचा तर उत्तरेच्या तुलनेत महाराष्ट्रात मोहरीचे पीक घेतले जात नाही. मात्र यंदाची स्थिती बघता शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड केल्यास त्यांना सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की आपल्याकडे आधीच तेलबियांची कमतरता आहे. ती भरुन काढण्यासाठी आपण 75 हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात करत आहोत. या वर्षी खाद्यतेलाचे भावही वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच रब्बीमध्ये शेतकऱ्यांनी तेलबियांची पिके घेतली तर आर्थिक लाभ होऊ शकतोच, खेरीज देशाचे परकीय चलनही वाचू शकते. आपल्याकडे रब्बीमध्ये घेतले जाणारे तेलपीक फक्त करडई आहे. त्यामुळे त्या बरोबरीने मोहरीच्या पिकाची लागवड केली तर जास्त फायदा मिळू शकेल.
वाटाण्याचा विचार केला तर आपल्याकडून उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात वाटाणा येतो. मात्र इथेही वाटाण्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ‌‘बोन व्हिले‌’ नामक जातीच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. उत्तरेकडे लावला जाणारा या जातीचा वाटाणा महाराष्ट्रातही चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आर्केल नामक जातीचा वाटाणा आपल्याकडे चांगल्या प्रकारे रुळला आहे. तेव्हा त्याचे पीक घेऊन उत्तम अर्थार्जन साधणे सहजशक्य आहे. मुख्य म्हणजे वाटाणा हे अवघ्या 60 ते 100 दिवसांचे पीक आहे. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला हवा.
अलिकडे हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या लागवडीवरही लक्ष केंद्रीत करायला हवे. असाही आपल्याकडे हरभरा चांगलाच येतो. दोन प्रकारचे हरभरे असतात. एक मोठा अर्थात काबुली हरभरा तर दुसरा मध्यम आकाराचा. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी काबुली हरभरा करत नाहीत. आपल्याकडे प्राधान्याने लहान हरभराच केला जातो. त्यामुळे आता हरभऱ्याची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काबुली हरभऱ्याचा अवश्य विचार करावा, कारण या हरभऱ्याला अधिक भाव मिळतो. नेहमीचा हरभरा पेरुन तेवढे पैसे मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन या हरभऱ्याच्या जाती निवडण्याचे काम आता शेतकऱ्यांनी करायला हवे. त्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठ वा उत्तरेकडील कृषी विद्यापीठांकडून माहिती घेण्यासही हरकत नाही. बियाणे उत्पादकांनीही या जाती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. नवीन सरकारने यावर भर दिला तर आणखी चांगले होईल. थोडक्यात, हरभऱ्यापासून चांगला पैसा मिळवण्याची ही संधी शेतकऱ्यांनी दवडता कामा नये. विशेष म्हणजे यंदा थंडी चांगली असल्यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा येणार आहे. त्यावर घाटी आळी आदी संकट येण्याचा संभव नाही. यावेळी रब्बी पिकांवर कीड आणि रोगांचे प्रमाणही कमी राहणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या हंगामाचा चांगला फायदा करुन घ्यावा.
गव्हाकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नसतो, कारण या पीकाला जास्त अवधी लागतो. खेरीज पाणीही जास्त लागते. पण थंडी चांगली असेल तर गव्हाचे पीक भरघोस येते आणि भावही चांगला मिळतो. खेरीज चांगल्या थंडीमुळे पीकाचा दर्जाही चांगला राहतो. जास्त उत्पादन आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. हे सगळे लाभ लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी गव्हाकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुबलक पाऊस पडल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. बोअरवेलला भरपूर पाणी आहे. नद्यांना पाणी आहे. या अधिकच्या पाण्याचा उपयोग करुन घेत चार पैसे जास्त मिळवून देणारी पिके घेण्याचा विचारच ठेवायला हवा. अर्थात बरेच शेतकरी चांगला नफा मिळवून देणाऱ्या जातींबद्दल अज्ञानी आहेत. पिकांच्या जातींबाबत कृषि खाते वा विद्यापीठांकडून आवश्यक तेवढा प्रचार आणि प्रसार केला गेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही माहिती मिळवणे गरजेचे आहे. हे सगळे करत असताना शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाजही घ्यायला हवा. उदाहरणार्थ, बाजारात वाटाण्याच्या हिरव्या शेंगांना जास्त पैसे मिळतात. त्यामुळे त्यांची तोड करुन हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या तर शेतकरी अधिक नफा मिळवू शकतील.
शेतकरी सगळी शेतीकामे उत्तम प्रकारे करतो. तो उत्तम मशागत करतो, उत्तम खते घालतो. पण त्याला बाजार व्यवस्था काही जमत नाही आणि तेथेच तो खरा मार खातो. जसे की, यावेळी कांद्याचे भाव 70 रुपयांवर गेले आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेता आता शेतकऱ्यांनी कांद्याबाबत विचार करुन निर्णय घ्यायला हवा. कांद्याची निर्यात खुली झाल्याची बाब त्यांनी विचारात घ्यायलाच हवी. यावेळी कधी नव्हे ते सरकारने शेतकऱ्यांवर उदार होऊन कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता कांद्यापासून फायदा करुन घेणे गरजेचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे या काळातील कांदा टिकायला चांगला असतो. पावसाळ्यातला कांदा टिकत नसल्यामुळे साठवता येत नाही. मात्र या हंगामातील कांदा साठवता येतो, टिकवता येतो. दुसरे म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश कांदा उत्पादनामध्ये अग्रणी असून जवळपासच्या सगळ्या आखाती प्रदेशातील कांद्याची मोठी मागणी भागवून चांगला नफा मिळवणे त्यांना सहजशक्य आहे. म्हणूनच यंदा निर्यातीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरणाऱ्या कांदा लागवडीचा विचार केला पाहिजे. पूर्वीप्रमाणे त्यांनी पेरणी करुन कांदा करु नये, कारण यामुळे कांद्याचा आकार आणि प्रत हवी तशी राहत नाही. हे लक्षात घेत निर्यातयोग्य कांदा करण्यासाठी त्यांनी रोपे तयार करुनच कांद्याचे उत्पादन घ्यावे. यामुळे त्यांना उत्तम दर्जाचा चांगला कांदा बाजारात पाठवता येईल. रब्बी हंगामासाठी कांद्याच्या वेगळ्या जाती आहेत. शेतकऱ्यांनी त्याचाही विचार करायला हवा. या जातीच्या कांद्याचा रंग चांगला असतोच, खेरीज प्रतही उत्तम असते. निफाडच्या कांदा संशोधन केंद्राने अशा जाती शोधल्या आहेत. तेव्हा माहिती घेत शेतकऱ्यांनी या कांद्याची लागवड केल्यास आर्थिक गणित बसवणे शक्य होईल.
आंब्यासाठीही चांगली थंडी पडणे अनुकूल ठरते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे यंदा थंडी चांगली पडली आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात ती चांगलीच राहण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आंबापिकाकडेही जातीने लक्ष देणे गरजेचे ठरेल. या काळात त्यांनी आंब्याच्या मोहोराची काळजी घ्यायला हवी, कारण त्यावर रोग पडण्याची शक्यता असते. तुडतुडे, भुरी रोगामुळे मोहोर गळून पडतो. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन तसे दिसल्यास योग्य फवारण्या करुन मोहोराची काळजी घेतली तर आंब्याचे प्रचंड आणि दर्जेदार उत्पादन घेणे कठीण नाही. निसर्गाची अनुकूल साथ राहिली तर महाराष्ट्रातील शेतकरी देशाचीच नव्हे, तर जगातील आंबाशौकिनांची रसनातृप्ती करेल एवढा आंबा पुरवू शकेल. खेरीज आंब्याची निर्यात करुन त्यांना चांगले अर्थार्जनही साधता येईल. त्यामुळेच आंबा निर्यातीसंदर्भात वेगवेगळ्या देशांच्या नियमांची, मानांकनांची, प्रतवारीची माहिती घेऊन त्यांच्या निकषांमध्ये बसणारे पीक घेतल्यास शेतकरी मालामाल होणे फारसे अवघड नाही.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *