पुणे : “आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. पण उभ्या हयातीत असा निकाल कधी पाहिला नाही. त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं महत्त्वाचे आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला.

“जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे त्यात लाडक्या बहिणींचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचारही करण्यात आला. दोन अडीच महिन्याची रक्कम एकत्र देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होई. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे  महिलांचे मतदान दोन ते तीन टक्क्याने वाढल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच  विरोधकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिल्यानंतर मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न विचारला जात असल्याचे पत्रकारांनी विचारलं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, असं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *