हरिभाऊ लाखे
नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात मोठ्या फरकाने महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने अनेक ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यासह पराभूत इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली. १५ मतदारसंघात १९६ पैकी १६५ म्हणजे ८४ टक्के उमेदवारांनी ही रक्कम गमावली. केवळ १६ उमेदवार आपली अनामत वाचवू शकले.
विधानसभेच्या जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवर एकहाती विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. राष्ट्रवादीने (अजित पवार) सर्वाधिक सात, भाजपने पाच तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन आणि एमआयएमने एक जागा मिळवली. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांसह काँग्रेसचा दारूण पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. अनामत रक्कम परत मिळण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते (१६.३३ टक्के) मिळणे आवश्यक असते. निवडणुकीत मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यास प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनामत वाचविणे शक्य होत नाही. ज्यांना तेवढी मते मिळतात, केवळ त्याच उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळते. उर्वरितांना ती गमवावी लागते. जिल्ह्यात १६५ उमेदवार तेवढी मते मिळवू शकले नाहीत. संबंधितांना अनामत रक्कम गमवावी लागली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १६ उमेदवार होते. मतदानासाठी या ठिकाणी दोन मतदार यंत्रांचा वापर करावा लागला. नाशिक पश्चिममध्ये १५ तर नाशिक मध्य चांदवड आणि नांदगावमध्ये प्रत्येकी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे १ लाख २९ हजार या सर्वाधिक फरकाने विजयी झाले. या मतदारसंघात दोन लाख तीन हजार मतदान झाले होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारास ३३ हजार मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना ३० हजार ३८४ मते मिळाली. तशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघातही झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी ८६ हजार ५८१ च्या मताधिक्याने विजय मिळवला. या मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख १४ हजार इतके झाले होते. प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लकी जाधव यांना अनामत रकमेसाठी ३५ हजार मते मिळणे आवश्यक होते. तथापि, त्यांना ३० हजार ९९४ मते मिळाली. बागलाणमध्ये दीपिका चव्हाण आणि इगतपुरीत लकी जाधव या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही अनामत रक्कम गमवावी लागली. उर्वरित १३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावरील नाशिक पश्चिम मतदारसंघ वगळता १२ मतदारसंघात उमेदवारांनाही ही रक्कम गमवावी लागली. त्यास केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघ अपवाद ठरला.
निवडणूक आयोगाच्या निकषानुसार १५ मतदारसंघात केवळ १६ उमेदवार एकूण मतदानाच्या एक षष्ठांशहून अधिक मते मिळवत अनामत रक्कम वाचवू शकले. यामध्ये येवल्यात माणिकराव शिंदे, नांदगावमध्ये समीर भुजबळ, चांदवडमधील गणेश निंबाळकर व केदा आहेर, देवळालीत राजश्री अहिरराव व योगेश घोलप, नाशिक मध्य मध्ये वसंत गिते, नाशिक पश्चिम मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरील सुधाकर बडगुजर व तिसऱ्या क्रमांकावरील दिनकर पाटील, नाशिक पूर्वमध्ये गणेश गिते, निफाडमध्ये अनिल कदम, कळवणमध्ये जे. पी. गावित, सिन्नरमध्ये उदय सांगळे, मालेगाव बाह्यमधील बंडुकाका बच्छाव, मालेगाव मध्यमधील असिफ शेख रशिद व दिंडोरीतील सुनिता चारोस्कर यांचा समावेश आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *