प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली
अनिल ठाणेकर
ठाणे : कर्नाटकमधील निपाणीतील कारदगा येथे २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सीमाभागातील मराठीप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा हा योग रविवारी जुळून आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, उद्योजक राजेंद्र पवार, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे संचालक इंद्रजीत पाटील, ब्रम्हाकुमारी साक्षी कमलापुरे, कारदगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन मुराबट्टे, चिंतामणी मगदूम, स्वागताध्यक्ष पद्मावतीताई अलंकार, डॉ. अच्युत माने, माजी आमदार सुभाष जोशी, श्री जंगली महाराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, प्रा. चंद्रकुमार नलगे फाऊंडेशनच्या अध्यक्ष अनिता नलगे, कन्नड बळग संघाचे गौरवाध्यक्ष राजू खिचडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
निपाणी येथील साहित्य विकास मंडळाकडून आयोजित करण्यात आलेले २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कारदगा येथे रविवारी संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड करण्यात आली होती. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सीमाभागाचा उज्ज्वल इतिहास आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, तसेच ग्रामीण साहित्य आणि ग्रामसंस्कृती यांच्या अनुबंधाचा पट उलगडून दाखवला. सीमाभागातील मराठी भाषक बंधू-भगिनी मराठी भाषा, संस्कृती आणि विचार प्राणपणाने जपण्याचे काम करत आहेत, असे सांगत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सीमाभागातील मराठीजनांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्राने सीमाभागातील मराठीजनांना नेहमी आपलेच मानले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणी-बेळगावसह ८६१ गावांतील मराठीजनांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत सीमाभागातील मराठीजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्र राज्याच्या कल्याणकारी योजना, तसेच आरोग्यसेवांचा लाभ सीमाभागातील मराठीजनांना मिळावा, यादृष्टीने महायुती सरकारने सकारात्मक पावले उचलली आणि यापुढेही महायुती सरकार सीमाभागातील मराठीजनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वासही प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. याविषयी बोलताना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले की, सीमाभागातील मराठीजनांच्या लढ्याशी शिवसेना नेहमीच एकनिष्ठ राहिली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सीमावासीयांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या विचारांवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या तरुणपणी सीमालढ्यातील आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यासाठी कर्नाटकमध्ये त्यांना महिनाभराचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. सीमावासीयांच्या वेदना आणि दु:ख माहीत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा शिवसैनिक सव्वादोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला. तेव्हापासून त्यांनी सीमावासीयांच्या हितासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनांमध्ये त्यांच्याविषयी, राज्य सरकारविषयी आणि महाराष्ट्राविषयी सकारात्मक भावना आहेत. या ग्रामीण साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणे, ही त्यामुळेच ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे. सीमाभागातील मराठीजन या चरित्रग्रंथाचे नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास असल्याची भावना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
००००
