अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेल्या महायुतीवर लोकांनी भरभरुन टाकलेला विश्वास, फेक नरेटिव्ह कुचकामी ठरणे, जातीपातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करत सामाजिक वातावरणात कमालीचा तणाव उत्पन्न करणारे निष्प्रभ ठरताना दिसणे, अतिशय खालच्या पातळीवरुन केल्या गेलेल्या वैयक्तिक पातळीवरील दोषारोप आणि कुचेष्टेनंतरही संयमीपणे परिस्थिती हाताळून आपले ‘मी पुन्हा येईन’हे ब्रिद खरे करुन दाखवणे या आणि यासारख्या अनेक गोष्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पहायला मिळाला. या निकालाने प्रत्येक राजकीय पक्षाला कल्पनाविश्वातून बाहेर काढत जनतेच्या मनातील त्यांचा चेहरा दाखवून दिला. स्वाभाविकच निकालानंतर काही चेहरे आणखी ‘गुलाबी’ होतील तर काही आणखी ‘गोरेमोरे’ होतील. पण काहीही असले तरी ताजे निकाल जनता डोळसपणे न्यायनिवाडा करत असल्याचे दाखवून देणारे आहेत, यात शंका नाही.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत दोन प्रमुख आघाडींमध्ये होती. त्या वेळी सरकारमध्ये असलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी आघाडीत समावेश करण्यात आला. निकाल लागला तेव्हा 288 सदस्यीय विधानसभेत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. त्याच वेळी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. अशा प्रका या आघाडीला एकूण 161 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर मित्रपक्ष काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र हा जागांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांपैकी एक चतुर्थांश जागा पश्चिम महाराष्ट्रातून येतात. म्हणजेच 288 जागांपैकी 58 जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या जागा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे काँग्रेस आणि अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. 2019 च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 जागांपैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 21 जागा जिंकल्या होत्या. या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात केवळ पाच जागा मिळाल्या, तर त्यांच्यापासून फुटलेल्या अजित पवार गटाला बारा जागा मिळाल्या. भाजपला 2019 मध्ये 17 जागा मिळाल्या होत्या, त्या यावेळी 24 झाल्या. या वेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. गेल्या वेळी येथून पक्षाचे दहा आमदार विजयी झाले होते.
कोकण-मुंबईतून 75 आमदार निवडून विधानसभेत जातात. या विभागात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात भाजप-शिंदेसेनेला आपला गड राखण्यात यश आले. मुंबई आणि कोकण विभागातील 75 पैकी भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकल्या. गेल्या वेळी त्या 27 होत्या. गेल्या वेळी उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला या भागात 29 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्या नऊवर आल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 23 जागा मिळाल्या. गेल्या वेळी या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला सहा तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या अनुक्रमे प्रत्येकी दोन झाल्या. याशिवाय इतरांना चार जागा मिळाल्या.
विदर्भ हा भाग राजकीय दृष्टिकोनातून पक्षांचे भवितव्य ठरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. 2019 च्या निवडणुकीमध्ये विदर्भातील एकूण 62 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 29 जागा जिंकल्या होत्या, त्या यावेळी वाढून 34 झाल्या. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 15 जागा अकरावर आल्या. 2019 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा जिंकल्या होत्या; मात्र या वेळी त्यांना एक जागा मिळाली. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा जिंकल्या होत्या. त्यांनी या वेळीही आपला आकडा कायम ठेवला. शिंदे सेनेने येथे पाच जागा जिंकल्या.
मराठवाडा हा महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचा प्रदेश आहे. येथून 46 आमदार निवडून येतात. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश होतो. या विधानसभा निवडणुकीत भाजपने येथे 15 आमदार जिंकले. गेल्या वेळी हा आकडा 16 होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळाल्या होत्या. या वेळी चार जागा आल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने बारा जागा जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या; या वेळी त्या दोनवर आल्या. याशिवाय अन्य पक्षांचे दोन आमदार निवडून आले.
उत्तर महाराष्ट्र जागांच्या बाबतीत सर्वात लहान प्रदेश आहे; परंतु येथून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करतात. अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक हे जिल्हे उत्तर महाराष्ट्रात मोडतात. या भागात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. 2019 मध्ये त्यातील सर्वाधिक 16 जागा भाजपने जिंकल्या होत्या; या वेळी हा आकडा 19 वर पोहोचला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 13 जागा जिंकल्या होत्या. या वेळी त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळाल्या तर अजित पवार यांच्या पक्षाला 11 जागा मिळाल्या. काँग्रेसने मागील वेळी येथे सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी हा आकडा तीनवर आला. ठाकरे यांच्या शिवसेनेचा आकडा सहावरून शून्यावर आला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे नऊ आमदार विजयी झाले. इतरांना येथे पाच जागांवर यश मिळाले.
एकंदरीत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, अजितदादा आणि भाजपच्या रणनितीने पवार पॉलिटिक्सवर एकदिलाने प्रयत्न करत मात केली तर मुंबई आणि कोकण भागात अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे आणि त्यांची शिवसेना चांगलीच कमी पडली. चुकलेल्या राजकीय चाली आणि आडाखे ठाकरींनाअ भारी पडले. विदर्भात काँग्रेसची ताकद भाजपने प्रयत्नपूर्वक मोडून काढली तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जातीय समिकऱ्णे सोडवत महायुतीने मैदान मारले.