कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर सध्या वारस असलेले छत्रपती शाहू महाराज हे महाआघाडी तर्फे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे विद्यमान शिंदे शिवसेनेचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक लढवत आहेत. काल एका प्रचार सभेत संजय महाडिक यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्हेच राजकीय वाद उत्पन्न झाले असल्याचे दिसून येत आहे.
काल एका सभेत बोलताना संजय महाडिक यांनी सध्याचे छत्रपती शाहू महाराज हे भोसले घराण्यातले दत्तक पुत्र आहेत, ते खरे वारसदार नाहीतच असे विधान केले होते. त्यांनी हे विधान करतातच महाआघाडीतील शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील या सर्वांनीच संजय महाडिकांवर टीकेची झोड उठवली आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादी बद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आदर असून विद्यमान शाहू महाराजांबद्दल अशा प्रकारे विधान करून संजय महाडिक यांनी छत्रपतींच्या गादीचा अवामान केला आहे, असा आरोप करीत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. पण हेच ज्यावेळी संजय राऊत यांनी सातारच्या गादीचे महाराज उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत वक्तव्य केले होते तेव्हा हीच सारी मंडळी चीडीचूप होते. कोल्हापुरच्या गादीला एक न्याय आणि सातारच्या गादीला दुसरा न्याय असे होऊ शकत नाही.
या संदर्भात इतिहास तज्ञांकडून माहिती घेतली असता कोल्हापूरच्या गादीवर सध्या विराजमान असलेले छत्रपती शाहू महाराज हे दत्तक पुत्र आहेत हे खरे आहे. हे शाहू महाराज हे मुळात नागपुरात भोसले घराण्याचे वंशज असून नागपूरकर राजे रघुजी भोसलेंचे चिरंजीव असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहिती घेतली असता कोल्हापूरच्या गादीवर आजवर दत्तक पुत्रच जास्त वेळा छत्रपती म्हणून विराजमान झालेले आहेत. मात्र एकदा दत्तक पुत्र म्हणून त्या परिवारात आले की ते त्या परिवाराचेच होतात. त्यामुळे शाहू महाराजांनाही या भोसले परिवाराचेच घटक मानायला हवे. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात छोटी छोटी संस्थाने होती. इंग्रज देशात येण्यापूर्वी ही सर्व छोटी छोटी राज्य होती. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्यांच्या दोन गाद्या, एक कोल्हापूरची, तर एक सातारची, अशा कार्यरत होत्या. इंग्रजांनी हळूहळू सर्व संस्थाने खालसा करत त्या संस्थानांना आपले मंडलिक बनवले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ही संस्थाने देखील स्वतंत्र झाली. मात्र नेहरू सरकारने ही सर्व संस्थाने खालसा करीत या सर्व संस्थानिकांना सरकारतर्फे पेन्शन देणे सुरू केले होते. त्याला प्रिव्हीपर्स असे नाव होते. नंतर इंदिरा गांधी सरकारने ही सवलत देखील बंद केली आणि हे सर्व संस्थानिक हे देशाच्या इतर नागरिकांप्रमाणे सामान्य नागरिकच बनवले गेले होते. आजही हे देशाचे सामान्य नागरिकाच आहेत.
अर्थात असे असले तरी काही ठिकाणी या राजघराण्यांबाबत जनसामान्यांमध्ये आदराची भावना होती. काही संस्थानिकांनी जनतेत मिसळून जात आपले लोकाभिमुख स्थान कायम ठेवले. त्यातील काही संस्थानिक हे राजकारणात येऊन उच्चपदस्थही बनले. यात विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे,ज्योतिरादित्य शिंदे, वसुंधरा राजे, विश्वनाथ प्रतापसिंह अशी अनेक नावे सांगता येतील. महाराष्ट्रातही काही अशी घराणी राजकारणात सक्रिय होती आणि आजही आहेत.
असे असले तरी घटनात्मक दृष्ट्या आज हे सर्व देशातील १४० कोटी नागरिकांपैकीच एक नागरिक आहेत. त्यांना घटनेने कोणतेही विशेष स्थान दिलेले नाही.
वस्तूतः आपल्या देशात लोकशाही व्यवस्था स्वीकारल्यावर ही राजेशाही आणि सरंजामशाही संपुष्टात आलेली आहे. ज्यांना जनमताचा पाठिंबा आहे आणि तो मतदानातून व्यक्त होतो आहे, असेच लोक देशाचे राज्याचे किंवा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. राजकारणी राजघराणी ही साधारणपणे स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढच्याच दशकात खालसा झाली होती. त्यानंतर या राजघराण्यातील ज्या वारसांनी स्वतःला लोकाभिमुख ठेवले आणि आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा वापर करून लोकहिताची कामे केली अशांना समाजाने आपले नेतृत्व देऊ केले आहे. आजही भोसले घराण्यातील काही व्यक्तींनी शैक्षणिक संस्थांची उभारणी करून लोकशिक्षणाचे कार्य केले आहे. तर काहींनी उद्योगही उभारले आहेत. अशांना समाजाने न मागता नेतृत्व देऊ केले आहे.
कोल्हापुरातही छत्रपतींच्या घराण्याने आजवर लोकसेवेचा वसा कायम ठेवलेला आहे. त्यामुळे आजही कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात त्यांना निश्चित मान आहे. कोल्हापूर शहरात आजही विजया दशमीला संध्याकाळी दसरा उत्सव साजरा केला जातो. हा शासन पुरस्कृत कार्यक्रम असून यावेळी शाहू महाराजांना मानाचे स्थान दिले जाते. इतरही कार्यक्रमांमध्ये देखील छत्रपती शाहू महाराजांना योग्य असा विशेष सन्मान देण्याची प्रथा आहे. ज्या प्रमाणे मुंबईत शेरिफचे पद असते तसेच स्थान कोल्हापूर शहरात छत्रपतींना देण्यात येते.असे असले तरी छत्रपती शाहू महाराज हे आजवर तरी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. त्यांचे चिरंजीव संभाजी राजे हे त्या तुलनेत बऱ्यापैकी सक्रिय आहेत. मधल्या काळात संभाजी राजे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत उतरतील अशी चर्चाही सुरू होती. बहुतेक त्यामुळेच संभाजी राजांना अडसर निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील कथित जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी खेळी खेळली आणि शाहू महाराजांना महाआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा म्हणजे शहाजी महाराजांचे वडील शाहू महाराज यांचे आणि उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील या शाहू महाराजांच्या उमेदवारीला उचलून धरले. परिणामी काँग्रेसला या प्रस्तावाला फारसा विरोध करता आला नाही आणि महाआघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले. असेही कळले की आपले वय लक्षात घेता आपल्याला प्रचार जमणार नाही असे शाहू महाराजांनी पवारांना स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची जबाबदारीही काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांनी उचलून धरली आहे. एकूणच महायुतीला अडवण्यासाठी पवारांनी ही खेळी खेळली. शाहू महाराज निवडणुकीत उभे राहणार हे कळताच साहजिकच संभाजी राजे मागे सरले आणि त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. इथे पवारांची खेळी यशस्वी झाली. त्यामुळे मग महायुतीने विद्यमान खासदार संजय महाडिक यांनाच मैदानात उतरवले आहे.
संजय महाडिक हे देखील दुसऱ्यांदा खासदारकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचेही मतदार संघात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे इथे लढत चांगली होणार असे बोलले जात आहे. हा मुद्दा लक्षात घेऊनच सध्या परस्परांवर टीकास्त्र सोडणे आणि त्यासाठी मुद्दे शोधणे हे सुरू आहे. या परिस्थितीत आता निर्णय मतदारांना घ्यायचा आहे. लोकशाही व्यवस्थेत उमेदवार हा जरी राजघराण्याचा असला आणि तो लायक वाटत नसला तर त्याला नाकारण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे, उमेदवार राजघराण्यातला असला नसला, तरी तो जनसेवक असला तर त्याला जनता डोक्यावर उचलून घेते. ना. त्यामुळे जनतेला कोल्हापूरच्या गादी बद्दल सन्मान वाटत असेल तर ते शाहू महाराजांना निवडून देतील. अन्यथा जनता दुसरा पर्याय शोधायला मोकळी असेल.तोवर तरी ही महाआघाडीची व्यर्थ कोल्हेकुईच ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *