स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणे गरजेचे असल्याचा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला असून भाजपा तो मान्य करीत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. या सगळ्या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत येत असून ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत एकत्रित बैठक घेऊन मुख्यमत्रीपदाचा तिढा सोडवतील असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान उद्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांना सोपवतील. त्यानंतर सहकाऱ्यांशी चर्चा करून ते मुख्यमंत्रीपदाबाबतचा पक्षाचा महत्वपुर्ण निर्णय घोषित करतील असे सुत्रांनी सांगितले.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या राज्यपाल सी. पी. यांची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या राज्यपालांच्या भेटीत एकनाथ शिंदे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तर मुख्यमंत्र्यांबरोबर फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देतील.
चौकट
शिंदेच्या मुख्यमंत्रपदासीठी
कोपरीत महाआरती
दरम्यान एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती सुद्धा आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेच हवे असल्याचं सांगितलं. कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. या आरतीला महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
शिंदेंसाठी प्लान बी
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी ‘प्लान बी’ ?
महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच १३२ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेने ५४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झालेतर भाजपचा शिंदेंसाठी ‘बी’ प्लॅन ठऱला असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर येतील का? हा प्रश्न आहे. अशा स्थितीत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर भाजप एकनाथ शिंदे यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण देऊ शकते आणि एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात. आणि महाराष्ट्रातात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा जुनाच फॉर्म्युला पुढेही लागू राहील.