ठाणे : अंबरनाथ जिल्ह्यातून वडोदरा राष्र्टीय महामार्ग जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादीत केलेल्या आहे. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही शेतजमीन संपादीत झाली आहे. पण त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळाला नसून तो परस्पर काढून घेतल्याचा आरोप करीत त्याविरोधात अंबरनाथचे आदिवासी शेतकरी बळीराज सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आजपासून बेमुदत अमरण उपोषणाला बसले आहेत.

सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वडोदरा महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मोठ्याप्रमाणात भूसंपादीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मौजे दहिवली, ता. अंबरनाथ, येथील स.नं. ६/३ मध्ये क्षेत्र ०.३५.४० हेक्टर जमिनीचे भूसंपादनही झालेले आहे. मात्र या जमिनीचा माेबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळता ताे परस्पर काढून भ्रष्टाचार केल्याचा आराेप या उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या भ्रष्टाचाराला कारणीभूत असलेले संबधीत प्रांत अधिकारी व दलाल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि संबंधित शेत जमिनीचा माेबदला मुळमालकाला मिळावा, या मागणीसाठी न्याय मिळावा यासाठी १३ आदिवासी शेतकरी आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत अमरण उपाेशणाला बसले, असे या बळीराज सेनेचे संपर्कप्रमुख दशरथ भाेईर यांनी लाेकमतला सांगितले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील दहिवली येथील सर्वे नंबर ६/३ मधील आदिवासी शेतकऱ्याची ०.३५.४० हेक्टर जमीन या वडाेदरा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन झाले आहे. या शेत जमिनीचा मोबदला साधारणतः पाच कोटी ७७ लाख रूपये असा असतांना सातबाऱ्यावरील (७/१२) वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये खात्यावर टाकणेत आले. त्यानुसार एकुण एक कोटी ७० लाख रूपये वारसांच्या खात्यावर पडले. परंतु त्यातील ही ७६ लाख रूपये प्रांत अधिकारी व दलाल यांचे नांवे नेरल बँकेतून परस्पर गेले, असा आरोप या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केलेला आहे. बेकेतुन परस्पर काढलेल्या रकमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम चार कोटी सात लाख रूपये दोन व्यक्तींच्या नांवे राहिली. परंतु ती रक्कम देखील प्रांत व दलाल यांनी परस्पर गायब केल्याचा आराेप या आदिवासी शेतकऱ्यांकडून केला जात आहे. हा घोळ गंभीर स्वरूपाचा असुन आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. त्याविराेधात कडक चौकशी करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेमुदत उपोषणकर्ते बळीराज सेनेचे पदाधिकारी व संबधीत आदिवासी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *