कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली जीवनविद्या मिशन ची प्रशंसा

 

कर्जत : सदगुरु वामनराव पै यांनी निर्माण केलेली  विश्वप्रार्थना म्हणजे  गीतेचे सार आहे, अशा शब्दांत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  जीवनविद्या मिशन ची प्रशंसा केली. थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जत येथील ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळाव्यातील आजच्या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीवनविद्या मिशन च्या कार्याचा गौरव केला. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना मंगलप्रभात लोढा यांनी विनम्र अभिवादन केले. धर्मरक्षणासाठी, मानवी जीवन सुखी करण्यासाठी चांगले संस्कार समाजाला मिळायला हवेत. हे चांगले संस्कार समाजाला जीवनविद्या मिशनसारख्या संस्था निस्वार्थपणे देत आहेत. याबद्दल त्यांनी सदगुरु आणि प्रल्हाद पै यांची विशेष कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद पै म्हणाले की, प्रत्येक मुल हे वेगवेगळं असतं. त्याच्यातील कौशल्य शोधून त्याला योग्य वाव देणं म्हणजे आनंदी पालकत्त्व. मुलांना संस्कार देणे म्हणजे त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे होय. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःमध्ये योग्य बदल करायला हवेत.
दुपारच्या सत्रात सदगुरुंचे पालकत्त्वावर विशेष मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे एका नाविण्यपूर्ण चर्चासत्रात आदरणीय श्री प्रल्हाद पै यांच्यासोबत पत्रकार दक्षता ठसाळे घोसाळकर आणि प्रोफेसर पूजा पवार जांभळे यांनी मुक्त संवाद साधला.
पालकत्त्व या विषयावर त्यांनी प्रल्हाद पैंना विविध प्रश्न विचारले. ज्यामध्ये आजच्या आधुनिक काळात पालकांना जाणवणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्न होते. त्यांना उत्तर देताना प्रल्हाद पै यांनी आनंदी पालकत्त्वाच्या विविध टीप्स सर्वांसोबत शेअर केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी एक सहज सोपी पालकत्त्वाची व्याख्याच सर्वांना सांगितली. “प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्वभावाचे असते. त्यामुळे प्रत्येक मुलात एक वेगळे कौशल्य दडलेलं असतं. आपल्या मुलामधील ही कौशल्ये शोधून त्यांना योग्य संधी देणे म्हणजे आनंदी पालकत्त्व होय.” मुलांमधील ही कौशल्ये शोधण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य वेळ द्यायला हवा. मुलांच्या आवडी निवडी जपायला हव्या. विशेष म्हणजे आपल्या मुलांना चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करा. त्यांचे मालक नाही तर पालक बना असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुलं ही पालकांचे निरिक्षण करून मोठी होत असतात. संस्कार कऱण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे गरजेचे आहे. मुलांवर चांगले संस्कार कऱण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये योग्य बदल करणेही तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलांना संस्कार देताना मुलांसोबत पालकांचा चांगला बॉन्ड तयार झाला पाहिजे. कारण त्यामुळे तुमची मुलं तुम्हाला न घाबरता त्यांच्या समस्या सांगतील आणि त्यांच्या जीवनातील आव्हाने तुम्हाला कमी करणं शक्य होईल. मुलांना चांगले नागरिक बनविण्यासाठी, उत्तम माणूस करण्यासाठी त्यांना जीवनविद्येचे संस्कार त्यांना द्या. तुम्हाला जर दोन जुळं मुलं असली तरी ती मुलं वेगवेगळी आहेत हे स्विकारा. त्यांच्यात एकमेकांशी तुलना करू नका. त्यापेक्षा प्रत्येकातील विशेष कौशल्य ओळखा आणि त्याच्या कौशल्यांना वाव द्या. कारण प्रत्येकाला या जगार परमेश्वराने एक विशेष उद्देशासाठी पाठवलं आहे. यासाठीच प्रत्येकामध्ये असलेलं हे वेगळं कौशल्य आईवडिलांनी ओळखणं गरजेचं आहे.
या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, श्रीसदगुरु पूजन, मानसपूजा आणि विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेची साधना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आय़ुष्यभर निस्वार्थपणे जीवनविद्या मिशनचे कार्य करणाऱ्या काही शिष्यमंडळींना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा हा पुरस्कार जेष्ठ प्रसारक कल्याणी पोतनीस, ज्येष्ठ नामधारक काशिनाथ पवार आणि प्रदीप सुभेदार यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *