सिंधुदुर्ग : राज्यातल्या महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक लोक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या शिवाय राज्यात एक विचाराचे सरकार यावे हे जनतेने ठरवल्यामुळेच मतदानाचा टक्का वाढला आणि महायुतीला घवघवीत यश मिळाले असे प्रतिपादन माजी बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
या निवडणुकीत संपूर्ण कोकण हा महायुतीचाच असल्याचेही सिद्ध झाले आहे असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे भेट देऊन भराडी देवीचे दर्शन घेतले.भराडी.मातेच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांचे सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रमोद जठार, ॲड.अजित गोगटे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,बाबा मोंडकर,विजय केनवडेकर,महेश कांदळगावकर आदी महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते होते.
गेल्या अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या तसेच केंद्रातील एन डी ए सरकारच्या सकारात्मक कारभारामुळेच मते वाढली आणि महायुतीच्या बाजूने कौल दिला असे सांगून चव्हाण म्हणाले की, ‘आगामी काळात सरकार चांगले काम करीलाच शिवाय कोकण आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रलंबित प्रश्नांकडे हे सरकार लक्ष देईल,’ अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. ‘लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झाले होते.याही निवडणुकीत जनतेचा महायुतीच्या बाजूने जो कौल दिला आहे त्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,’ असेही चव्हाण म्हणाले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *