ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघावर एकनाथ शिंदेच्या शिवसेना एवेजी भाजपाने आपला दावा सांगितल्याने पेच कायम आहे. त्यातच ठाण्यातून जर भाजपाला तिकीट मिळालीच तर ती आयारामांना न देता पक्षातील निष्ठावंताना मिळावी यासाठी निष्ठावंताच्या जोर बैठका सुरु झाल्या आहेत.
असताना या जागेवर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या नेतृत्वालाच एकप्रकारे गुगली टाकली आहे. ठाण्याची जागा भाजपला मिळावी आणि येथून नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांना रिंगणात उतरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. असे असताना नेतृत्वाने विचार केल्यास मी आनंदाने लोकसभा लढवेन असे वक्तव्य करत आमदार केळकर यांनी पक्षातील जुन्या निष्ठावंतांचा विचार उमेदवारीसाठी आधी करावा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वेक्षणाचा दाखला देत या मतदारसंघातून भाजपला अधिक संधी असल्याचा या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे संजीव नाईक यांनी मिरा-भाईदर तसेच ठाण्यातील काही भागात बैठकांचा सपाटा लावल्याने शिंदेसेनेत कमालिची अस्वस्थता आहे. नाईक यांनी नवी मुंबईतील त्यांच्या निकटवर्तीयांना हा मतदारसंघ आपल्याला सुटेल असा संदेश यापुर्वीच दिला असून तयारीला लागा अशा सूचनाही दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना ठाणे शहराचे पक्षाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर केळकर यांच्या भूमीकेमुळे भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नाही असे चित्र पुढे आले आहे. एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, या भाजपा नेत्यांनी हा मतदार संघ गाजवला होता. आता आमदारांची संख्या आणि पक्षाची वाढलेली ताकद लक्षात घेता ठाणे भाजपलाच मिळायला हवा, असे मत संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे.